गीता जैन यांनी धरली शिवसेनेची कास, भाईंदरमध्ये भाजपला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:31 AM2020-02-27T00:31:39+5:302020-02-27T00:31:54+5:30

महापौर-उपमहापौर निवडणूक; समर्थक नगरसेवक सेनेसोबत

Shiv Sena's case held by Geeta Jain, BJP's push in Bhayandar | गीता जैन यांनी धरली शिवसेनेची कास, भाईंदरमध्ये भाजपला धक्का

गीता जैन यांनी धरली शिवसेनेची कास, भाईंदरमध्ये भाजपला धक्का

googlenewsNext

मीरा रोड : विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर भाजपचे गुणगाण गाणाऱ्या आमदार गीता जैन यांनी मीरा-भार्इंदरच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेची कास धरल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या. पालिकेतील सत्ता सहभागात भाजप नेतृत्वाकडून सातत्याने केवळ आश्वासनेच मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. भाजप नेतृत्व सतत नरेंद्र मेहतांना झुकते माप देत असल्याने त्या संतापल्या होत्या.

गीता जैन यांनी भाजपतील त्यांच्या चार नगरसेवकांसह शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे स्थानिक राजकारणात त्या सेनेसोबत जाणार असल्याचे स्पष्ट आहे. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वातील सरकार सत्तारुढ असल्याने विरोधी बाकावरील भाजपसोबत राहिल्यापेक्षा शिवसेनेशी जवळीक साधून दोन कामे करुन घेण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपने हाणून पाडले विरोधकांचे डावपेच
महापौरपदासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मर्जीतील रूपाली शिंदे-मोदी तर उपमहापौरपदासाठी ध्रुवकिशोर पाटील यांची नावे आघाडीवर होती. पण, भाजपच्या ४५ नगरसेवकांनी जसनाळे यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळे आधीच नाराजी, त्यात फुटीची चिन्हे पाहून चव्हाणांनी स्वत:च्या हातात सूत्रे घेतली. नगरसेवकांचे पहिल्यांदाच व्यक्तिगत मत विचारले गेल्याने हसनाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उपमहापौरपदासाठी मेहता समर्थक ध्रुवकिशोर यांचा पत्ता कापल्याने त्यांचेच दुसरे समर्थक गेहलोत यांना उमेदवारी देण्यात आली. ज्येष्ठ नगरसेवक मदन सिंह, प्रभात पाटील, रीटा शाह यांच्यासह अन्य इच्छुकांना डावलल्याने नाराजीचा सूर होता. त्यातच शिवसेना आणि गीता जैन यांच्याकडून भाजपला सुरुंग लावण्याची भीती असताना चव्हाण यांनी विरोधकांची खेळी यशस्वी होऊ दिली नाही. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून सेना-काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचा जोरदार प्रयत्न झाला. सेना-काँग्रेसच्या तीन नगरसेविका शेवटपर्यंत बेपत्ता राहिल्या.

शिवसेनेचे दावे ठरले पोकळ : भाजपमधील अंतर्गत नाराजी तसेच इच्छुकांमधील मतभेदांवरून या निवडणुकीत चमत्कार घडवण्याच्या शिवसेना नेत्यांच्या वल्गनाच ठरल्या. या निवडणुकीसाठी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक व काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन हे जातीने उपस्थित होते. परंतु, महापौरपदाच्या निवडणुकीत सेनेच्या शिर्केंना केवळ ३६ मतेच मिळाल्याने सर्वांनी काढता पाय घेतला. या निवडणुकीत सेना व काँग्रेसला त्यांच्या नगरसेवकांना सांभाळता आले नाही. भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा त्यांचा प्रयत्नदेखील सपशेल फसला.

बंडखोरांवर करणार कारवाई
भाजपच्या मॉरस रॉड्रिक्स, परशुराम म्हात्रे, वैशाली रकवी आणि अश्विन कासोदरिया या चार नगरसेवकांनी बंडखोरी केल्याने, तर विजय राय गैरहजर राहिल्याने त्यांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची कारवाई तातडीने सुरू करणार असल्याची माहिती भाजप नेत्यांनी दिली. तसेच भाजपला सहकार्य करणाºया शिवसेना नगरसेविका अनिता पाटील, दीप्ती भट आणि काँग्रेसच्या सारा अकरम यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा शिवसेना आणि काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे भूमिगत नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख यांनी महाविकास आघाडीला मतदान केले. या दोन्ही नगरसेवकांनी आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सर्वांना सोबत घेऊन काम करणार - महापौर
नवनिर्वाचित महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. या शहराने मला खूप काही दिले असून, महापौरपद मिळाल्याने जनतेचा आणि पक्षाचा विश्वास सार्थ ठरवेन. त्याला तडा जाईल, असे काम होणार नसल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: Shiv Sena's case held by Geeta Jain, BJP's push in Bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.