केडीएमटी सभापतीपदावरही शिवसेनेला सोडावे लागणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 01:26 AM2020-01-06T01:26:18+5:302020-01-06T01:33:30+5:30

केडीएमसीचे स्थायी समिती सभापतीपद गमावण्याची नामुश्की शिवसेनेवर ओढावली असताना आता परिवहन समितीच्या पुढील सभापतीपदावरही सेनेला पाणी सोडावे लागणार आहे.

Shiv Sena will have to leave water even as KDMT chairperson | केडीएमटी सभापतीपदावरही शिवसेनेला सोडावे लागणार पाणी

केडीएमटी सभापतीपदावरही शिवसेनेला सोडावे लागणार पाणी

googlenewsNext

कल्याण : केडीएमसीचे स्थायी समिती सभापतीपद गमावण्याची नामुश्की शिवसेनेवर ओढावली असताना आता परिवहन समितीच्या पुढील सभापतीपदावरही सेनेला पाणी सोडावे लागणार आहे. परिवहनचे सभापतीपद सध्या स्वत:कडे असताना पुन्हा ते आपल्याकडेच राखण्याचा चंग बांधला गेला होता. मात्र, आता संख्याबळाच्या आधारे हे पद भाजपकडेच जाणार असल्याने सेनेचे मनसुबे धुळीस मिळण्याची दाट शक्यता आहे.
परिवहन समितीमधील सहा सदस्य विहित कालावधीअंती गतवर्षी २८ फेब्रुवारीला निवृत्त झाले होते. रिक्त जागांसाठी १५ फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात आली. निवडणुकीनंतरचे समितीतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेचे आणि भाजपचे प्रत्येकी सहा सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो आणि हे पद त्यावेळी शिवसेनेकडे होते. त्यामुळे सेनेचे सात सदस्य समितीमध्ये होते. परिवहनचे सभापतीपद शिवसेनेकडे असताना विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या सत्तांतरात पुढील सभापतीपदही आपल्याकडेच कायम राखण्याचा पवित्रा सेनेने घेतला होता. दुसरीकडे भाजपनेही सभापतीपद मिळालेच पाहिजे, असा चंग बांधला होता. पण, आता स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर भाजपचे पारडे जड झाले आहे. काँग्रेस आणि मनसेच्या मदतीने स्थायीचे सभापतीपद पटकावल्याने संख्याबळाच्या आधारे परिवहनचे सभापतीपदही पटकावणे भाजपला सहज शक्य झाले आहे. परिवहनमध्ये सेना आणि भाजपचे समसमान प्रत्येकी सहा सदस्य आहेत. स्थायी समिती सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असल्याने आता भाजपकडे सात सदस्य आहेत. त्यामुळे स्थायी समितीपाठोपाठ परिवहन समिती सभापतीपदही भाजपकडे जाणार, यात शंका नाही. परिवहन सभापतीपदाचा कालावधी एक वर्षाचा असतो, त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणे अपेक्षित आहे. मात्र, मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ती होऊ शकली नव्हती, ती निवडणूक जूनमध्ये झाली होती. मागील निवडणुकीत शिवसेनेचे मनोज चौधरी बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक उशिरा झाल्याने त्यांना नऊ महिन्यांचाच कालावधी मिळाला. आता आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केडीएमसीच्या निवडणुका असल्याने नव्याने निवडून येणाऱ्या सभापतींनाही सात महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.
>दोन दिवसांत भूमिका स्पष्ट होईल
स्थायी समितीमध्ये सर्वाधिक आठ सदस्य असतानाही शिवसेनेला सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. शिवसेनेचे वामन म्हात्रे आजारी असल्याने निवडणुकीला उपस्थित राहू शकले नाहीत. याबाबत, त्यांनी एकनाथ शिंदे आणि विनीता राणे यांना पत्र पाठवले होते. पण, अनुपस्थितीबाबत कारवाई होईल, असे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी निवडणुकीनंतर स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या सदस्या हर्षदा भोईर यांनीही पक्षादेश डावलल्याने त्यांच्यासह गटनेते नंदू म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठवण्यात येईल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. पण, दोन दिवस उलटूनही ठोस कृती झालेली नाही. दरम्यान, दोन दिवसांत ठोस भूमिका घेऊ, असे दोन्ही पक्षांकडून ‘लोकमत’ला सांगण्यात आले.

Web Title: Shiv Sena will have to leave water even as KDMT chairperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.