शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या, मटक्याच्या वादातून हल्ल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 08:51 IST2023-05-28T08:50:55+5:302023-05-28T08:51:22+5:30

गुन्हे अन्वेषण विभाग व पोलिस पथक आरोपींचा शोध घेत आहेत.

Shiv Sena Shinde group shakha pramukh killed attack predicted over matka dispute | शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या, मटक्याच्या वादातून हल्ल्याचा अंदाज

शिवसेना शिंदे गटाच्या शाखाप्रमुखाची हत्या, मटक्याच्या वादातून हल्ल्याचा अंदाज

उल्हासनगर : येथील कॅम्प नं. ५ मधील जयजनता कॉलनीत राहणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख शब्बीर शेख याची शुक्रवारी रात्री जुन्या भांडणातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने हत्या केली. हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून,  हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग व पोलिस पथक आरोपींचा शोध घेत आहेत.

जयजनता कॉलनी परिसरात राहणाऱ्या शेख याचा मटका, जुगार धंद्यातून एका टोळक्यासोबत वाद झाला हाेता. त्यातूनच शुक्रवारी रात्री घरासमोर उभा असताना शेख याच्यावर सात ते आठ जणांच्या टोळीने धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात शेख याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत हिललाइन पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मध्यवर्ती रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. शहर गुन्हे अन्वेषण विभाग व हिललाइन पोलिसांचे पथक आरोपींचा शाेध घेत आहेत.

शेख याचे वडील कट्टर शिवसैनिक असून, ते शहर उपप्रमुख राहिले आहेत, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. तो कोणता व्यवसाय करीत होता, याबाबत माहीत नसल्याचे चौधरी म्हणाले. जयजनता कॉलनी परिसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार शब्बीरचा मटक्याचा धंदा हाेता. त्याचा काही दिवसांपूर्वी एका टोळक्यासोबत वाद झाला होता. यातूनच त्याचा खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

उल्हासनगरमध्ये घटनेनंतर तणाव
गेल्या महिन्यात मटका, जुगाराच्या खोलीची शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख कैलास तेजी, महिला समन्वयक जया तेजी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली होती. मात्र, मटक्याचा धंदा यापूर्वीच बंद होता, असे स्पष्ट करत हिललाइन पोलिसांनी कैलास तेजीसह अन्य पदाधिकाऱ्यांवर तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Shiv Sena Shinde group shakha pramukh killed attack predicted over matka dispute