ठाणे महापालिकेत शिंदेसेना-भाजप एकत्र; युती झाल्याने शिंदेसेनेतील फाटाफूट थांबली : सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 08:45 IST2025-12-18T08:44:09+5:302025-12-18T08:45:03+5:30
शिंदेसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आल्याने दोन्ही पक्ष ठाणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

ठाणे महापालिकेत शिंदेसेना-भाजप एकत्र; युती झाल्याने शिंदेसेनेतील फाटाफूट थांबली : सरनाईक
ठाणे : शिंदेसेना आणि भाजपमध्ये आलेल्या वितुष्टामुळे दोन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात होता. युती झाली नाही तर शिंदेसेनेतील काही महत्त्वाच्या माजी नगरसेवकांचा भाजपची कास धरण्याचा प्रयत्न होता. परंतु, युती झाली आणि ही संभाव्य फाटाफूट थांबली, अशी भावना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात व्यक्त केली.
शिंदेसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आल्याने दोन्ही पक्ष ठाणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.
मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीतून पालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सरनाईक यांनी महायुतीच्या निर्णयाचे स्वागत केले.
संभ्रम दूर झाला
महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी काही जण संभ्रमात होते, निवडणूक जवळ येताच काही जण वेगवेगळे पर्याय तपासत होते. मात्र महायुतीचा निर्णय झाल्यानंतर योग्य निर्णय कोणता, हे सर्वांना समजले. ठाणे महापालिकेत शिवसेनेला मोठे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
येत्या महापालिका निवडणुकीत महायुती सरकारने केलेल्या कामांना जनतेकडून योग्य प्रतिसाद मिळेल, असा दावाही सरनाईक यांनी केला.
राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये महायुती करून निवडणुका लढवण्याचा निर्णय हा संघटनात्मक ताकद वाढवणारा आहे.
विशेषतः मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये पूर्ण युती होणार असल्याची घोषणा झाल्यामुळे अनेक वर्षापासून निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्या शिवसैनिकांना नवी दिशा मिळाली, असेही सरनाईक म्हणाले.