कल्याण- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला चाकूने भोसकून ठार केले. ज्या व्यक्तीवर चारित्र्याचा संशय घेतला जात होता. त्याच्यावरही चाकूने वार करणा-या पतीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्याचा अंतिम निकाल आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. गोगरकर यांनी दिला. या खटल्यात सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी काम पाहिले. या खटल्यातील तपास कामात पोलीस डी. एस. लोखंडे व एस. पी. पाटील यांनी मेहनत घेतली. उल्हासनगरातील कॅम्प नंबर एक परिसरातील अमरधाम येथे राहणारा भजनसिंग लभाणा हा सुताराचे काम करायचा. त्याला त्याच्या पत्नीवर संशय होता. तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. लभाणाला तीन मुले होती. रागाच्या भरात त्यांनी चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकूने हल्ला करून तिला ठार मारले.तसेच पत्नीचे हितेश धामेजा याच्या सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय लभाणाला होता. पत्नीच्या हत्येपश्चात त्याने हितेशवर धारदार चाकूने वार करून त्यालाही गंभीर जखमी केले होते. ही घटना 23 सप्टेंबर 2012 साली घडली होती. या प्रकरणी हितेशचे वडील वासूमल यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात लभाणाच्या विरोधात पत्नीची हत्या व हितेशवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लभाणाला तातडीने अटक केली होती.लभाणाला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने जामीन दिला नव्हता. त्यामुळे त्याची रवानगी घटनेच्या दुस-या दिवसापासून आधारवाडी कारागृहात करण्यात आली होती. या प्रकरणात 26 साक्षीदार सरकारी वकील पक्षाने तपासले. न्यायालयाने पत्नीच्या हत्येप्रकरणी व हितेशवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी लभाणाला सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर चार हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. हत्या व प्राणघातक हल्ला या दोन्ही आरोपप्रकरणी प्रत्येकी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा लभाणाला एकत्रित भोगावी लागणार आहे.
पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 20:46 IST