मद्याच्या दुकानातून पावणे सात लाखांची रोेकड चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 00:56 IST2021-05-24T00:53:42+5:302021-05-24T00:56:49+5:30
ठाण्यातील मखमली तलावाजवळील एस लिकर्स या मद्याच्या दुकानातून तब्बल ६ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड आणि सीसीटीव्हीच्या डीव्हीआरसह मद्याच्या काही बाटल्याही चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

ठाण्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातील मखमली तलावाजवळील एस लिकर्स या मद्याच्या दुकानातून तब्बल ६ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड आणि सीसीटीव्हीच्या डीव्हीआरसह मद्याच्या काही बाटल्याही चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मखमली तलाव येथील आकाश गृहनिर्माण सोसायटीमधील शॉप क्रमांक एकमधील एस लिकर्स या मद्य विक्रीच्या दुकानात चोरट्यांनी २१ मे रोजी रात्री ८ ते २२ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान स्लायडिंगचे लॉक तोडून शटर उचकटून दुकानात शिरकाव केला. त्यावेळी चोरट्यांनी दुकानातील तब्बल पावणेसात लाखांची रोकड ठेवलेले नामांकित कंपनीचे लॉकर, तसेच मद्याच्या मोठ्या प्रमाणात बाटल्या आणि इतर महत्त्वाचे सामान दुकानातून लंपास केले. आपल्या दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुनील खुबचंदानी यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात २२ मे रोजी तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडीक हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.