ठाणे: वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांनी एका प्रकरणावरुन खडसावल्याने नैराश्येपोटी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शारदा देशमुख यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, दरेकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.कापूरबावडी परिसरातील हॉटेल आमराई येथे १५ दिवसांपूर्वी हाणामारीचा एक प्रकार घडला होता. हा तपास उपनिरीक्षक देशमुख यांच्याकडे होता. या आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न करुनही ते त्यांना मिळाले नव्हते. यासाठी दरेकर यांनी त्यांना वारंवार आदेशही दिले होते. अखेर या प्रकरणातील चौघे आरोपी शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरेकर यांच्याकडे हजर झाले होते. आता या आरोपींना तातडीने अटक करा आणि न्यायालयात त्यांना हजर करा, असे आदेश दरेकर यांनी देशमुख यांना दिले. मात्र, त्यांना स्टेशन हाऊस डयूटी (ठाणे अंमलदार) असल्यामुळे त्यांनी आजच्या ऐवजी उद्या (शनिवारी) अटक करते, असे सांगितले. त्यानंतर दरेकर यांनी देशमुख यांना चांगलेच फैलावर घेतले. रागाच्या भरात दरेकर यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरल्यामुळे त्या शांत राहिल्या. नंतर पोलीस ठाण्यातील डायरीमध्ये तब्येत बरी नसलयामुळे घरी जात आहे. त्यामुळे पुढील कर्तव्य करु शकत नसल्याची नोंद करुन त्या वर्तकनगर येथील आपल्या घरी परतल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी फिनाईल हे किटकनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने वर्तकनगर येथील एका खासगी रुग्णालयात ११.३० वा. च्या सुमारास दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.................................दरेकर यांची बदलीया प्रकरणाची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत चौकशीचे आदेश त्यांनी वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना दिले आहेत. चौकशी होईपर्यत दरेकर यांना नियंत्रण कक्षामध्ये हलविण्यात आले आहे. तोपर्यंत कल्याणराव कर्पे यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची प्रभारी सूत्रे राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.................................‘‘ एका गुन्हयातील आरोपीला अटक करण्याच्या वादावादीतून नैराश्यापोटी देशमुख यांनी फिनाईल प्राशन केले. याप्रकरणी चौकशीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.’’अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट.......................................
वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या जाचाने महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न
By जितेंद्र कालेकर | Updated: August 10, 2018 20:25 IST
एका गुन्हयातील आरोपींना अटक करावी, यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्याशी झालेल्या वादातून नैराश्य आल्याने कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक शारदा देशमुख यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या जाचाने महिला अधिकाऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न
ठळक मुद्देआरोपींना अटक न केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने घेतले होते फैलावरदरेकर यांची तडकाफडकी बदलीखासगी रुग्णालयात उपचार सुरु