Road Safety Week: Bike's 'Dhoom' Shaan Kills! Strict action is needed along with public awareness | रस्ते सुरक्षा सप्ताह: बाइकचे ‘धूम’शान जीवघेणे! जनजागृतीबरोबर कडक कारवाई हवी

रस्ते सुरक्षा सप्ताह: बाइकचे ‘धूम’शान जीवघेणे! जनजागृतीबरोबर कडक कारवाई हवी

जितेंद्र कालेकर

ठाणे : ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये ताशी १५० ते २०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या स्पोर्ट्स बाइक्स योग्य प्रशिक्षणाच्या, सुरक्षा उपाययोजनांच्या अभावी चालवणे पादचाऱ्यांसाठी तसेच चालकांकरिता धोकादायक ठरत आहेत. अशा बाइकर्सवर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मत वाहतूक पोलिसांनी व्यक्त केले आहे. मात्र लक्षावधी रुपये किमतीच्या या बाइक्स चालवणारे बरेचदा शहरांतील उद्योगपती, राजकीय नेते, माफिया यांच्या कुटुंबातील तरुण असल्याने ते पोलिसांना जुमानत नाहीत. अपघात झाल्यास पैसे चारून किंवा दबाव टाकून प्रकरण मिटवण्याकडे त्यांचा कल असतो.

एकेकाळी वाहतुकीची गरज असलेली दुचाकी आता खास लांब पल्ल्याचे अंतर कमी वेळात कापण्यासाठी तसेच हौस म्हणून वेगाने पळविण्यासाठी वापरली जाऊ लागली आहे. त्यामुळे १०० सीसीची इंजिन क्षमता असलेल्या बाइक्सऐवजी थेट १२०० ते २७०० सीसी इंजिन क्षमतेच्या बाइक्स वापरण्याकडे तरुणाईचा कल आहे. 

इंजिनच्या या भरमसाट क्षमतेमुळे बाइक्सचा वेगही वाढला आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे एकीकडे मोठा वर्ग बेकारी, भूक वगैरेचा सामना करीत असताना दुसरीकडे ठाण्यात जानेवारी २०२० ते जानेवारी २०२१ या वर्षभरात दहा लाख ते २१ लाख किमतीच्या २२ दुचाकींची नोंदणी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.
एका नामांकित कंपनीची ही स्पोर्ट्स बाईक २१ लाख १५ हजारांची, तर दुसरी २० लाख ७५ हजारांची आहे. तिचे नोंदणी शुल्क हे अडीच हजार असून रस्ता कर हा चार लाख २३ हजारांच्या घरात आहे. तर एक बाईक दहा लाखांच्या घरात आहे. काहींनी अन्यत्र आपल्या बाइक्सची नोंदणी करूनही त्या ठाण्यात आणल्या आहेत. अशा या महागड्या स्पोर्ट्स सुपर बाइक्स काही जणांसाठी स्टेट्स सिम्बॉल आहेत.

असे आहेत धोके
कमी वयात योग्य प्रशिक्षण न घेतलेले १८ ते २४ वयोगटातील अनेक तरुण या मोटरसायकली वेगाने चालवितात. अनेकदा रात्रीच्या वेळी या स्पोर्ट्स बाइक्सची रेस लावली जाते किंवा एकाच वेळी धूम धूम या बाइक्स पळवून रात्रभरात लांबचा पल्ला गाठून पहाटेपर्यंत पुन्हा ठाणे गाठले जाते.  अनेकदा एका चौकातून दुसऱ्या चौकात या बाइक्स जाईपर्यंत सिग्नल लागलेला असतो. कधी कधी एखादा पादचारी अचानक मध्ये आल्याने भीषण अपघात होतो. यात पादचारी किंवा या चालकाचाही मृत्यू ओढवतो. अलीकडेच दहा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील पाम बीच रोडवर धूम चित्रपटात दाखविलेली महागडी स्पोर्ट्स बाईक चालविणाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुचाकी खरेदी केल्यानंतर अवघ्या चौथ्या दिवशीच चालकाचा मृत्यू झाला.

ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निरीक्षक गुणवंत निकम यांनी सांगितले की, अशा दुचाकी चालविताना वेगळे जॅकेट (रायडिंग सूट), हेल्मेट आणि शूजची गरज असते. अशीच एखादी नवी गाडी घेतली की, तिचा वेग किती ठेवायचा, तो नियंत्रित कसा करायचा, याचा अंदाज न आल्यामुळे अनेकदा अपघात होतो. अनेक पालक मुलांच्या हट्टापायी त्यांना स्पोर्ट्स बाईक घेऊन देतात. पण त्यांना योग्य प्रशिक्षण आणि सुरक्षित प्रवासाकरिता सूट देणे अपेक्षित आहे. 

निरीक्षक गुणवंत निकम हे स्वत: अशा सुपर बाईक चालवितात. त्यांनी अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर या बाईक कशा चालवायच्या, कोणते धोके टाळायचे, ४००पेक्षा अधिक सीसीच्या आणि जास्त हॉर्सपॉवरच्या गाड्या कशा चालवायच्या याचाही अचूक अंदाज येणे गरजेचे आहे. ताशी १५० किमीपेक्षा अधिक वेग नसावा, कॉर्नर कसा घ्यावा, दोन वाहने आल्यास कोणत्या लेनमध्ये असावे, याचे मोफत प्रशिक्षण निकम आणि त्यांचा ग्रुप देत असतो. रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांविरुद्ध कलम १८४ नुसार वाहतूक पोलीस कारवाई करतात. शिवाय, अपघाताचीही भीती असते, त्यामुळे योग्य वेगातच या सुपर बाइक्स चालविण्याचा सल्ला आरटीओ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

सुपर बाइक्सच्या वेडापायीच एका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्याही मुलाला जीव गमवावा लागला. ३३ हॉर्स पॉवर इंजिन ही दैनंदिन वापराची बाईक असते, तर ३३ ते १०० हॉर्स पॉवरची बाईक अनुभवी चालकांसाठी असते. १०० पेक्षा अधिक हॉर्स पॉवरच्या बाइक्स या सुपर बाइक्समध्ये मोडतात. परदेशात अशा सुपर बाइक्ससाठी वेगळे लायसन्स असते. शिवाय, ते २४व्या वर्षी मिळते. भारतात १८व्या वर्षी लायसन्स मिळते. त्यामुळे सुपर बाइक्ससाठी वेगळे लायसन्स दिले जावे, असे मत निकम यांनी व्यक्त केले.बऱ्याचदा शनिवार, रविवारी या स्पोर्ट्स बाईकवरून लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक अपघात याच दिवशी झाले आहेत. नेमकी याच दोन दिवशी सुट्ट्यांमुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी असते.

Web Title: Road Safety Week: Bike's 'Dhoom' Shaan Kills! Strict action is needed along with public awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.