बापरे! गर्भवती महिले धडक देणाऱ्या रिक्षा चालकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 21:30 IST2020-10-06T21:29:52+5:302020-10-06T21:30:23+5:30
Accident : गर्भवती महिलेस उपचारासाठी तीन रुग्णालयांनी नकार दिल्यावर चौथ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले .

बापरे! गर्भवती महिले धडक देणाऱ्या रिक्षा चालकास अटक
मीरारोड - भाईंदर पश्चिमेला जेवण करून फेरफटका मारणाऱ्या गर्भवती महिलेचा ९ वा महिना सुरु होता आणि एका भरधाव रिक्षा चालकाने धडक देऊन महिलेस जखमी केल्याची घटना सोमवारी रात्री ११. ३० वाजताच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली आहे. तर गर्भवती महिलेस उपचारासाठी तीन रुग्णालयांनी नकार दिल्यावर चौथ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले .
भाईंदर पश्चिमेस देवचंद नगरमधील मूळ इमारतीत राहणाऱ्या कांचन ( २९) ह्या गर्भवती असून त्यांना ९ वा महिना सुरु आहे. सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास जेवण झाल्यावर त्या पती सागर व त्यांच्या मित्र अमितसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील ( ६० फूट ) कोठार भागात फेरफटका मारत होत्या. त्यावेळी समोरून रिक्षा अतिशय वेगाने आली आणि थेट कांचन व अमित यांच्यावर धडकली. ह्या अपघातात कांचन ह्यांच्या पाठीला मार बसला तर अमितच्या हाता - पायास मुका मार लागला. जखमी कांचन ह्यांना नजीकच्या दोन - तीन खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता कुठे डॉक्टर नव्हते तर कुठे कोरोना रुग्णालय असल्याने उपचारास नकार देण्यात आला. अखेर एक रुग्णालयात त्यांना दाखल करून घेतले. तर अमित वर भाईंदर पूर्वेच्या रुग्णालयात उपचार केले गेले. या अपघाताप्रकरणी रिक्षाचालक केतन बाबुलाल जैन रा. सेक्टर १ , शांती नगर , मीरारोड याला भाईंदर पोलिसांनीअटक केली आहे. अपघातात रिक्षाचे देखील नुकसान झाले आहे.