भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:38 IST2025-12-26T13:35:32+5:302025-12-26T13:38:06+5:30
Leopard Spotted In Thane: ठाण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या पोखरण रोड क्रमांक २ परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या मानवी वस्तीतील वावरामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भाईंदरमध्ये बिबट्याने सात जणांना जखमी केल्याची घटना ताजी असतानाच, आता ठाणे शहरात बिबट्याचे दर्शन झाले. ठाण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या पोखरण रोड क्रमांक २ परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील पोखरण रोड २ परिसरातील बेथनी हॉस्पिटलजवळील एका बांधकाम साईटवर आज सकाळी बिबट्या वावरताना काही नागरिकांना दिसला. यापूर्वी गुरुवारी रात्रीही या परिसरात बिबट्या असल्याचा संशय आल्याने वनविभागाला पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या पथकाने तातडीने परिसरात ट्रॅप आणि सीसीटीव्ही कॅमेरेही लावले. मात्र, बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला नाही. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा बांधकाम साईटवर बिबट्या दिसल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. भरवस्तीत बिबट्या आल्याने या परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला
वनविभागाचे पथक सध्या घटनास्थळी तैनात असून परिसरातील बिबट्याचा शोध घेत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना रात्रीच्या वेळी एकट्याने घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये आणि बिबट्या दिसल्यास तातडीने वनविभागाला कळवावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
वनविभागाची डोकेदुखी वाढली
काही दिवसांपूर्वीच भाईंदरमध्ये बिबट्याने मानवी वस्तीत शिरून अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात सात जण जखमी झाले होते. भाईंदरमधील त्या बिबट्याला जेरबंद करून पंधरा दिवसही उलटले नाही, तोच आता ठाण्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढली आहे.