कळवा स्थानकानजीक लागलेल्या आगीदरम्यान वृद्ध महिलेला आला हार्ट अॅटॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 20:45 IST2020-02-14T20:42:17+5:302020-02-14T20:45:17+5:30
खोळंबलेल्या लोकलमधील प्रवाश्यांचा गर्दीत एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला.

कळवा स्थानकानजीक लागलेल्या आगीदरम्यान वृद्ध महिलेला आला हार्ट अॅटॅक
मुंबई - कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांशेजारी असलेल्या कचऱ्याला आग लागली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मध्य रेल्वेची ठाणे-कल्याणदरम्यानची धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक बंद करण्यात आली होती. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी ही आग लागल्याने घरी निघालेल्या चाकरमान्यांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला. आज सायंकाळी ४. २५ वाजताच्या सुमारास कळवा रेल्वे स्थानकाजवळ ही आग लागली होती. दरम्यान खोळंबलेल्या लोकलमधील प्रवाश्यांचा गर्दीत एका वृद्ध महिलेला हृदयविकाराचा झटका आला.
ट्रॅकशेजारील कचऱ्याला आग, मध्य रेल्वेची ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील वाहतूक बंद
शिवाजीनगर, कळवा, ठाणे (प). येथे रेल्वे रुळाखालील गटारामध्ये कचऱ्याला आग लागली होती, ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी मिळून काही वेळातच सदरची आग विझविली. परंतु या घटनेमुळे अंदाजे ४० ते ५० मिनिटे रेल्वे वाहतूक थांबविण्यात आल्याने कळवा स्थानकाजवळ उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून डोंबिवलीकडे जाणाऱ्या रेल्वे लोकलमधील प्रवासी रेवती संपत (६३) यांना लोकलमधील गर्दीत हृदयविकाराचा झटका आला. या एम. के. ठाकूर कॉम्प्लेक्स, जुना मुंबई-पुणे मार्ग, शिळफाटा, मुंब्रा येथे राहणाऱ्या असून त्यांना तात्काळ आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय, कळवा, ठाणे येथे दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.