'उत्तर'सभेत पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ'; राज ठाकरे कुणाची उत्तरक्रिया करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 20:06 IST2022-04-11T20:04:59+5:302022-04-11T20:06:13+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्याच्या इतिहासातील सगळ्यात भव्य सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

'उत्तर'सभेत पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ'; राज ठाकरे कुणाची उत्तरक्रिया करणार?
ठाणे: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खळबळ उडवुन देणाऱ्या 'लाव रे तो व्हीडीओ' या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाक्याची प्रचिती आज होणाऱ्या ठाण्यातील 'उत्तर सभेत पुन्हा एकदा घेता येणार आहे.सोशल मिडियात हिंदुत्वाचा ज्वलंत पुरस्कार करीत धुमाकुळ घालणाऱ्या टीझरमुळे राज ठाकरे यांची मंगळवारची जाहिर सभा अविस्मरणीय ठरण्याची चिन्हे आहेत.दरम्यान,गडकरी रंगायतन समोरील सभेसाठी दोन्ही रस्त्यांवर श्रोत्यांची झुंबड उडणार असल्याने वाहतुक पोलिसांनी हे रस्ते वाहतुकी साठी प्रवेश बंद केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्या दिवशी शिवतीर्थावर केलेल्या भाषणानंतर सत्ताधाऱ्यासह अनेकांनी टीकेचे आसुड ओढले होते. या सर्वाचा समाचार घेण्यासाठी तसेच उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची 'उत्तरसभा' आज (मंगळवार दि.१२ एप्रिल) ठाण्याच्या गडकरी रंगायतनसमोरील डॉ.मूस रोडवर होत आहे.या सभेसाठी मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महाराष्ट्र सैनिक कार्यरत असुन सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेचे फलक, बॅनर यासह मनसेकडून सोशल मिडियात जारी करण्यात आलेल्या टीझरचा चांगलाच बोलबाला सुरु आहे.
दरम्यान, गत लोकसभा निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात धुमाकूळ घालणाऱ्या 'लाव रे तो व्हीडीओ' या सारख्या अनोख्या तंत्राचा अवलंब ठाण्यातील उत्तर सभेपासुन पुन्हा सुरु होणार असल्याची खात्रीलायक माहिती मनसे सुत्रांनी दिली. तर,राज ठाकरे यांच्या या व्हीडीओ अस्त्राच्या पवित्र्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात मात्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.
ठाण्याच्या इतिहासातील सगळ्यात भव्य सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्याच्या इतिहासातील सगळ्यात भव्य सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विरोधकांचा समाचार यामध्ये घेण्यात येणार आहे. ठाणे मनसेकडून जोरदार तयारी सभेची आयोजन करण्यात आली असून आता राज ठाकरे यांच्या आगमनाची आतुरता लागली आहे. या सभेत पुणे शहराचे माजी अध्यक्ष वसंत मोरे येणार असून संबोधित करणार आहेत.