मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका ठाणे परिवहन सेवेला देखील बसल्याचे दिसून आले. सोमवारी रात्री कोपरी येथील इलेक्ट्रीक बस चार्जिंग स्टेशनचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने मंगळवारी रस्त्यावर १२३ पैकी केवळ ३२ बसच रस्त्यावर धावल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही सकाळी ज्या बस रस्त्यावर गेल्या होत्या, त्या देखील दुपारी २ नंतर डेपोत जमा झाल्याने इलेक्ट्रीक बस वगळता डिझेल आणि सीएनजीवर धावणाºया बसच रस्त्यावर धावत होत्या. त्या देखील धिम्या गतीने त्याचा परिणाम उत्पन्नावर देखील झाल्याचे दिसून आले.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३५० च्या आसपास बस आहेत. त्यातील २१० बस या सीएनजी आणि डिझेलवर धावणाºया बस आहेत. तर नव्याने परिवहनच्या ताफ्यात १२३ इलेक्ट्रीक बस दाखल झाल्या आहेत. परंतु सततच्या पावसाचा फटका याच इलेक्ट्रीक बसला आहे. या इलेक्ट्रीक बसचा डेपो कोपरी येथे आहे, याचठिकाणी या बस चार्ज केल्या जात आहेत. परंतु सोमवारी रात्री ११ च्या सुमारास येथील वीज पुरवठा खंडीत झाला. त्याचा परिणाम म्हणून १२३ पैकी केवळ ३२ बस रस्त्यावर मंगळवारी धावल्या. चार्जींग स्टेशनचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने बस चार्जींगच होऊ शकल्या नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळी बसचा ताबा घेण्यासाठी आलेल्या चालक आणि वाहकांना डेपोतच बसून राहण्याची वेळ आली. कोपरी येथील डेपोत तब्बल ९१ बस उभ्या असल्याचे दिसून आले. या संदर्भात परिवहनचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मात्र २० ते २५ इलेक्ट्रीक बस बाहेर न पडू शकल्या नसल्याचा दावा केला आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणीत या ठिकाणी ९१ बस उभ्या असल्याचे दिसून आले.
चार्जींग स्टेशनला वीज पुरवठा करणारी केबल तुटल्याने येथील वीज पुरवठा खंडीत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार तो सुरळीत करण्यासाठी दुपारी १२ च्या सुमारास दुरुस्ती पथक दाखल झाले. त्यानंतर चार तास वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे सकाळच्या सत्रात ज्या ३१ बस बाहेर पडल्या होत्या. त्या देखील दुपारी १ नंतर डेपोत जमा होत असल्याचे दिसून आले. एकूणच सोमवार आणि मंगळवारी टीएमटीला पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. सोमवारी उत्पन्न २४ लाखांच्या आसपास तर मंगळवारी हेच उत्पन्न १२ लाखांच्या आसपास झाल्याचे दिसून आले.