डाळी, कडधान्यांना महागाईची फोडणी; रोगप्रतिकारशक्तीसाठी वाढती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 12:27 AM2020-08-14T00:27:03+5:302020-08-14T06:48:59+5:30

किरकोळ बाजारात दर वाढले, प्रथिनयुक्त पदार्थांवर भर

pulses and cereals hits by inflation in corona crisis | डाळी, कडधान्यांना महागाईची फोडणी; रोगप्रतिकारशक्तीसाठी वाढती मागणी

डाळी, कडधान्यांना महागाईची फोडणी; रोगप्रतिकारशक्तीसाठी वाढती मागणी

Next

- स्रेहा पावसकर 

ठाणे : घाऊक बाजारात डाळी, कडधान्ये यांचे भाव स्थिर असतानाही किरकोळ बाजारपेठेत मात्र छोट्या व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनदरम्यान झालेली आपली तूट भरून काढण्यासाठी डाळी, कडधान्यांच्या दरांत वाढ केली आहे. लॉकडाऊनपूर्वीच्या डाळी, कडधान्यांचे दर पाहता आताच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.

कोरोनामुळे सर्वच व्यापार, उद्योग, नोकरीधंद्यांची गणिते बदलून गेली आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बाजारपेठा, दुकानेही बंद होती. आता अनलॉक केल्यावर काही प्रमाणात दुकाने सुरू झाली. मात्र, अन्नधान्याच्या सगळ्याच वस्तूंचे दर वाढलेले दिसत आहेत. मुळात या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध कॅल्शिअम, प्रथिनयुक्त पदार्थ खाण्यावर भर दिला जात आहे. तसेच श्रावणात अनेकजण मांसाहार करीत नाही. त्यातच, पालेभाज्यांचे भावही कडाडले आहेत. या सर्वच कारणांनी गेल्या काही दिवसांत डाळी, कडधान्ये अधिक प्रमाणात खाल्ली जात आहेत. किरकोळ बाजारातील याची मागणी पाहता डाळी, कडधान्यांच्या दरात वाढ झाली आहे. सर्वच कडधान्ये शरीराला पोषक असतात. ती शरीराला हानी पोहोचवत नाहीत. त्याने पचनशक्ती सुधारते. तसेच ती लवकर खराब होत नाहीत, यामुळे कोरोनाच्या दरम्यान आणि येत्या काळातही कडधान्य, डाळींना मागणी राहणार आहे.

डाळी आधीचे दर आताचे दर
कडधान्य (प्र.कि) (प्र.कि)
तूरडाळ ९० ११०
मूगडाळ ११० १२५
चणाडाळ ६० ८०
हि. वाटाणा १४० १६०
स. वाटाणा ९० १००
चणा ६५ ८०
चवळी १०० १२०
काबुली चणा ९० १००
मटकी ११० १२५
राजमा १०० १००

कोरोनाच्या दरम्यान सर्वच वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती. मालवाहतूकही बंद असल्याने बाजारात आवक कमी होती आणि मागणी वाढली होती. त्यामुळे सर्वच वस्तूंचे दर वाढत असताना धान्य, डाळी, कडधान्यांचे भावही थोडे वाढले होते. त्यातच अनेक महिने व्यापाऱ्यांची दुकानेही बंद होती. त्यांनाही प्रचंड नुकसान सहन करावे लागले होते. आता अनलॉकमध्ये काही प्रमाणात दुकाने उघडली आहेत. किरकोळ बाजारात धान्य, डाळी, कडधान्यांचे दर मात्र थोडे वाढलेले आहेत. तर, आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाचे दर वाढल्याने आपल्या बाजारातही तेलाच्या दरात २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. - शंकर ठक्कर, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघ

लॉकडाऊनदरम्यान बाजारात प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत. डाळी, कडधान्यांचे दरही थोडे वाढलेले आहेत.
- भावेश चौरसिया, व्यापारी

Web Title: pulses and cereals hits by inflation in corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.