सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:38 IST2025-10-07T20:37:41+5:302025-10-07T20:38:36+5:30
वकील राकेश किशोर यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मूक आंदोलन

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कक्षातच वकिल राकेश किशोर तिवारी याने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाकडून ठाण्यात मूक निदर्शने करण्यात आली. काेर्ट नाका येथील डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून संविधानाच्या प्रती हातात घेत शांततेत निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले. तर डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सोमवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीदरम्यान घडलेल्या या प्रकाराने न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. यावेळी मनोज प्रधान म्हणाले,‘सरन्यायाधीश हे देशाच्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च स्थानावर आहेत. जर त्यांनाच न्यायालयात संरक्षण नसेल, तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा करावी?’ अशी खंत व्यक्त केली. तर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी म्हटले की, ‘ही घटना केवळ व्यक्तीविरोधात नसून संपूर्ण न्यायप्रणालीविरोधातील हल्ला आहे.’ तर युवक अध्यक्ष अभिजीत पवार यांनी या प्रकाराला “सनातन धर्माच्या नावाखाली सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न” असे संबोधले.