फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

By जितेंद्र कालेकर | Updated: August 10, 2025 07:14 IST2025-08-10T07:14:32+5:302025-08-10T07:14:55+5:30

ऑन ड्युटी नसलेल्या ठाणे मुख्यालयातीलच एका हवालदाराने त्यांना या पार्टीसाठी मदतीचा ‘हात’ दिल्याचे समजते

Prisoners convicted of fraud break out of jail and drink alcohol for four hours | फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

जितेंद्र कालेकर

ठाणे : वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आल्यानंतर फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी करण ढबालिया आणि राजेशभाई पांबर यांनी एका हाॅटेलमध्ये मद्यपार्टी झोडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. धक्कादायक बाब म्हणजे ऑन ड्युटी नसलेल्या ठाणे मुख्यालयातीलच एका हवालदाराने त्यांना या पार्टीसाठी मदतीचा ‘हात’ दिल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणाची आता सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. 

कळवा येथील महापालिकेच्या  रुग्णालयात ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सात न्यायालयीन कैद्यांना तपासणीसाठी ४ ऑगस्ट २०२५ रोजी नेले होते. त्यावेळी  मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त डॉ.  पवन बनसोड यांनी अचानक या रुग्णालयात कैद्यांसह बंदोबस्तावरील पोलिसांची झाडाझडती घेतली. त्यावेळी बंदोबस्ताचे प्रभारी  
हवालदार गंगाराम घुले यांच्यासह नऊ कर्मचारी उपस्थित होते. मात्र, सातपैकी पाच कैदी त्या ठिकाणी आढळले. 

...अन् फाेनाफाेनीला केली सुरुवात

दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास झाडाझडती झाल्यानंतर ढबालिया आणि पांबर यांना न घेताच पोलिस व्हॅन कळवा रुग्णालयातून बाहेर पडली. 

आपले बिंग फुटेल या भीतीने घुले यांच्यासह इतरांनी फोन केल्यानंतर हॉटेलात मद्य ढोसत बसलेले दोघे कैदी कारागृहात जाण्यापूर्वी पुन्हा पोलिस व्हॅनमध्ये येऊन बसल्याचे बोलले जात आहे. आराेपींच्या बंदाेबस्तामध्ये हलगर्जी झाल्याने नऊ पाेलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. ऑन ड्युटी किंवा ड्युटीवर नसलेल्या कर्मचाऱ्याने न्यायालयीन कैद्यांना मद्यपार्टीसाठी मदत केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. आशुतोष डुंबरे, पोलिस आयुक्त, ठाणे शहर
 

Web Title: Prisoners convicted of fraud break out of jail and drink alcohol for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.