ठाण्याचा अभिमान : डॉ. महेश बेडेकर यशस्वीपणे पार केली जगातील सातवी मेजर मॅरेथॉन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 15:49 IST2025-08-31T15:48:43+5:302025-08-31T15:49:44+5:30
ही कामगिरी करणाऱ्या जगातील फक्त ४,००० धावपटूंमध्ये डॉ. महेश बेडेकर यांचा समावेश झाला असून, या यादीत अवघे तीन भारतीय आहेत.

ठाण्याचा अभिमान : डॉ. महेश बेडेकर यशस्वीपणे पार केली जगातील सातवी मेजर मॅरेथॉन
ठाणे : ठाण्यातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटू डॉ. महेश बेडेकर यांनी जगातील सातवी मेजर मॅरेथॉन असलेली सिडनी मॅरेथॉन आज यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यांनी ३:३३:२३ तासांच्या आत ४२ किमी अंतर पार केले. विशेष म्हणजे, ही कामगिरी करणाऱ्या जगातील फक्त ४,००० धावपटूंमध्ये त्यांचा समावेश झाला असून, या यादीत अवघे तीन भारतीय आहेत. त्यातील एक म्हणजे डॉ. बेडेकर यांचा समावेश होता.
सिडनीत आयोजित या मेजर मॅरेथॉनमध्ये जगभरातील १०० देशांतील तब्बल ३५ हजार धावपटूंनी सहभाग घेतला. डॉ. बेडेकर यांच्यासह ठाण्यातील अशोक पुजारी (३:३४:१७), विवेक थिलकन (३:३९:५५), प्रशांत सिन्हा (४:०८:०३) आणि चिन्मय सेनगुप्ता (४:२८:३६) यांनीही या स्पर्धेत दमदार कामगिरी केली.
सिडनी मॅरेथॉनला यंदा जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने मेजर मॅरेथॉनचा मानाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. बॉस्टननंतर ही सर्वांत कठीण मॅरेथॉन मानली जाते, कारण या मार्गात सतत चढ-उताराचा सामना करावा लागतो.
सकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या शर्यतीत प्रचंड थंडी, सकाळी ५ वाजता पोहोचण्याचे आव्हान आणि सततच्या चढ-उतारांवर मात करून धावपटूंनी दमदार कामगिरी बजावली. डॉ. बेडेकर यांनी सांगितले, “सिडनीचे रूट सहा मेजर मॅरेथॉनपेक्षा अधिक कठीण असले तरीही ते तितकेच सुंदर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात, ऐतिहासिक हार्बर ब्रिजसारख्या स्मारकांच्या साक्षीने धावण्याचा अनुभव खूप वेगळा आणि अविस्मरणीय ठरला. ही मॅरेथॉन म्हणजे केवळ धावण्याची स्पर्धा नसून मानवी जिद्द, चिकाटी आणि उद्दिष्ट गाठण्याची प्रेरणादायी पर्वणी आहे.”
“मॅरेथॉनमुळे शिस्त लागते आणि धावताना आपण एका मेडिटेशन झोनमध्ये प्रवेश करतो,” असा खास अनुभव त्यांनी व्यक्त केला. डॉ. बेडेकर आणि ठाण्यातील त्यांच्या सहकाऱ्यांच्या या यशस्वी कामगिरीने ठाणेकरांचा मान अभिमानाने उंचावला आहे.