पोलीस असल्याची बतावणी करून दीड लाखाचे दागिने लुबाडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 23:36 IST2021-05-24T23:26:54+5:302021-05-24T23:36:53+5:30
पोलीस असल्याची बतावणी करून एका मोटारसायकवरून आलेल्या तीन भामट्यांनी ७२ वर्षीय वृद्धेकडील एक लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना रविवारी सकाळी पारसिकनगर येथे घडली.

पोलीस असल्याची बतावणी करून दीड लाखाचे दागिने लुबाडले
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पोलीस असल्याची बतावणी करून एका मोटारसायकवरून आलेल्या तीन भामट्यांनी ७२ वर्षीय वृद्धेकडील एक लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना रविवारी सकाळी पारसिकनगर येथे घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पारसिकनगर येथे राहणारी ही वृद्ध महिला २३ मे रोजी सकाळी पावणेसातच्यासुमारास भाजीपाला घेऊन टोरन्ट पॉवर कार्यालयाजवळ असलेल्या शंकर मंदिराच्या समोरील सार्वजनिक रस्त्यावरून पायी घरी जात होती. त्याचवेळी पाठीमागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून तिघे भामटे तिथे आले. त्यांनी या वृद्धेला आपण पोलीस असल्याची बतावणी करीत तिच्या गळयातील ६६ हजारांचे तीन तोळे वजनाचे दोन पदरी सोन्याचे मंगळसूत्र आणि ९९ हजारांच्या प्रत्येकी दीड तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या बांगडया असा एक लाख ६५ हजारांचा ऐवज त्यांनी एका वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून ते त्यांच्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्याचे भासविले. प्रत्यक्षात ते पिशवीत न ठेवता तिथून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या वृद्धेने याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एल. खिलारे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.