तयारी पूर्ण, आता लढाई न्यायासाठी; खासदार बाळ्या मामा यांची घोषणा
By नितीन पंडित | Updated: September 12, 2025 16:35 IST2025-09-12T16:34:24+5:302025-09-12T16:35:46+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गावापर्यंत कार रॅलीचे आयोजन.

तयारी पूर्ण, आता लढाई न्यायासाठी; खासदार बाळ्या मामा यांची घोषणा
- नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गावापर्यंत कार रॅलीचे आयोजन रविवारी १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मानकोली येथून करण्यात आले असून या रॅलीत दोन हजारांहून अधिक कार सहभागी होणार आहेत.शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली भिवंडीतून नवी मुंबईत दाखल होऊन जासाई गावात दि.बा.पाटील यांना अभिवादन करण्यात येईल यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आता पुढची लढाई हि न्यायासाठीचीच असणार आहे,जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार,केंद्र सरकारने आमचा अंत पाहू नये असा इशारा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला दिला आहे.
दि.बा.पाटील हे राष्ट्रीय नेते व थोर समाजसुधारक होते मात्र आतापर्यंत संकुचित वृत्तीच्या राजकारण्यांनी त्यांना फक्त ठाणे रायगड पुरता मर्यादित ठेवले होते. मात्र त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य फार मोठे आहे. आगरी कोळी भूमीपुत्रांसाठी त्यांचे कार्य आभाळा एवढे असल्याने नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव मिळावे हि बाब आम्हा लाखो आगरी,कोळी व भूमिपुत्र बांधवांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.त्यामुळे जर त्यांचे नाव विमानतळाला दिले नाही तर लाखोंच्या संख्यने भूमिपुत्र उग्र आंदोलन करतील व विमानतळाचे उदघाटन देखील होऊ देणार नाही आणि यास सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असेल असा इशारा खा.बाळ्या मामा यांनी यावेळी दिला.
असा असेल कार रॅलीचा मार्ग
मानकोली मोठागाव रोड येथून रॅली निघणार असून पुढे खारेगाव,कळवा,विटावा,दिघा,ऐरोली नाका,रबाळे,घणसोली,कोपरी गाव,पामबीच मार्ग,सानपाडा,नेरूळ,करावे,नवी मुंबई पालिका मुख्यालय सर्कल,डावी कडून उरणकडे रेतीबंदर,विमानतळ रेती बंदर गेट ते चिंचपाडा,पारगाव ओवाळे, जासई असा हा कार रॅली मार्ग असून जासई येथे दि.बा.पाटील यांच्या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.