पवारांना दे धक्का! राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा, लवकरच शिवबंधन बांधणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 16:08 IST2019-07-09T16:07:26+5:302019-07-09T16:08:24+5:30
आगामी तीन ते 4 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आमदारांकडूनही पक्षबदलीच्या हालचाली सुरू आहेत.

पवारांना दे धक्का! राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा, लवकरच शिवबंधन बांधणार
ठाणे - ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे बरोरो हे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा आपल्या खांद्यावर घेऊन लढतील, असेच दिसून येते.
ठाणे जिल्ह्यात जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर पांडुरंग बरोरा यांच्याकडे राष्ट्रवादी नेते म्हणून पाहिले जात होते. कारण, 1980 पासून बरोरा कुटुंब राष्ट्रवादी सर्वेर्वा खासदार शरद पवार यांच्याशी स्नेहसंबंध जोडून होते. मात्र, राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादची होत असलेली पिछेहट आणि भाजपा नेत्यांचं वाढतं प्रस्थ लक्षात घेऊनच बरोरा यांनी शिवबंधन हाती बांधल्याची चर्चा आहे. लवकरच बरोरा यांचा अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश होणार आहे. दरम्यान, आगामी तीन ते 4 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आमदारांकडूनही पक्षबदलीच्या हालचाली सुरू आहेत.