भिवंडीतील उड्डाणपुलांवर खड्डयांचे साम्राज्य; तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतरही मनपा प्रशासन निद्रिस्त
By नितीन पंडित | Updated: October 4, 2023 19:13 IST2023-10-04T19:12:03+5:302023-10-04T19:13:02+5:30
या मार्गावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.

भिवंडीतील उड्डाणपुलांवर खड्डयांचे साम्राज्य; तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतरही मनपा प्रशासन निद्रिस्त
भिवंडी:भिवंडी शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून शहरातील धामणकर नाका व वंजारपट्टी नाका येथील डॉ एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपूलवर प्रचंड खड्डे पडले आहेत.तीन दिवसांपूर्वीच वंजारपट्टी नाका येथील उड्डाण पुलावर आमीर इसाक सय्यद या २६ वर्षीय तरुणाचा खड्ड्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे.मात्र तरुणाच्या मृत्यूनंतरही मनपा प्रशासन निद्रिस्त असून मागील तीन दिवसातही या उड्डाण पुलावरील खड्डे भरण्यासाठी मनपा प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नसल्याने मनपा प्रशासना विरोधात नागरिकांसह प्रवाशांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
धामणकर नाका उड्डाणपुलावर अजमेर नगर बाजूला सुरुवातीलाच प्रचंड खड्डे पडले आहे.तर उड्डाणपुलावर मध्यभागी देखील खड्डे पडले असून पद्मानगर कडील बाजूवर देखील प्रचंड खड्डे पडले आहेत.येथे महापालिकेने पेव्हरब्लॉकच्या साहाय्याने खड्डे भरले आहेत मात्र पेव्हरब्लॉकची खडी वर पसरल्याने दुचाकी स्वारांचे नेहमी अपघात होत आहेत.तर वंजारपट्टी नाका उड्डाणपुलावर मध्यभागी व चावीन्द्राकडे जाणाऱ्या बाजूकडे मोठमोठे खड्डे पडले आहेत.तर खड्डे बुजविण्यासाठी आणलेली माती मिश्रित खडी उड्डाणपुलावरच बाजूला ढिग मारून ठेवली असल्याने हि खडी रस्त्यावर येऊन दुचाकीस्वार या खडीवरून घसरून येथे नेहमी अपघात होत आहेत.
भिवंडीतील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून अंजुर फाटा ते वंजारपट्टी नाका रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत असून या मार्गावर दिवसा व रात्री देखील प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. याच मार्गावर भिवंडी बस आगार,महापालिका मुख्यालय, प्रांताधिकारी कार्यालय,पोलीस उपायुक्त कार्यालय, तहसीलदार कार्यालय,सह दुय्यम निबंधक कार्यालय,भिवंडी न्यायालय व इतर कार्यालये असल्याने या रस्त्यावरून नागरिक रोज ये जा करत असतात. मात्र या मार्गावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.