राजकारण्यांचा ४00 कोटींच्या स्टेम प्राधिकरणावर डोळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:52 AM2019-11-27T01:52:55+5:302019-11-27T01:53:31+5:30

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, केडीएमसी आणि मीरा भाईंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा करणारे स्टेम प्राधिकरण पाच वर्षांपूर्वी आर्थिक संंकटात सापडले होते.

Politicians eye's on 400 crore stem authority | राजकारण्यांचा ४00 कोटींच्या स्टेम प्राधिकरणावर डोळा

राजकारण्यांचा ४00 कोटींच्या स्टेम प्राधिकरणावर डोळा

googlenewsNext

- सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, केडीएमसी आणि मीरा भार्इंदर या महापालिकांसह भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना पाणीपुरवठा करणारे स्टेम प्राधिकरण पाच वर्षांपूर्वी आर्थिक संंकटात सापडले होते. मात्र, आता या प्राधिकरणाची ४०० कोटी रुपयांच्या जवळपास मालमत्ता आहे. तीवर डोळा ठेवून या कंपनीवर आपल्या निकटवर्तींची वर्णी लावण्यासाठी राजकारण्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

स्टेमघर प्राधिकरण ही पाणीपुरवठा करणारी देशातील पहिली व एकमेव कंपनी आहे. २०१४ पर्यंत या कंपनीच्या अभियंत्याचे वेतन करण्याचीदेखील ऐपत नव्हती. आर्थिक डबघाईला आलेल्या या कंपनीला सावरण्यासाठी सेवानिवृत्त विवेकानंद चौधरी यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आणि त्यांनी महापालिकांकडे थकलेली पाणीपट्टी कायदेशीर बाजूने वसूल केली. आता कंपनीला गेल्या पाच वर्षांत २८० कोटी रूपये नफा प्राप्त होऊन कंपनीची मालमत्ता ४०० कोटी रुपयांची झाली आहे. या कंपनीच्या मालमत्तेवर डोळा ठेवून महापालिकांमधील काही वरिष्ठ राजकारण्यांनी या प्राधिकरणावर आपल्या निकटवर्तींची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी वेगवगेळ्या कुरापती सुरू केल्याचे ऐकायला मिळत आहे.

उल्हास नदीवरून पाणी उचलणारे स्टेम प्राधिकरण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या काही भागासह भिवंडी, मीरा भार्इंदर आणि ठाणे महापालिका आदींमधील ४० लाख नागरिकांना पाणीपुरवठा करते. भिवंडी महापालिकेकडे १५ वर्षांपासूनची पाणीपट्टी रखडली होती. या महापालिकेसह मीरा भार्इंदर महापालिकेकडे रखडलेल्या कोट्यवधी रुपयांचे बिल लवादाच्या कायद्यानुसार वसूल करण्यात यश मिळाले आहे. आता स्टेमची ४०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तीवर डोळा ठेवून या कंपनीच्या व्यवस्थापकपदी निकटवर्तीय अभियंत्याची वर्णी लावण्याच्या काही राजकारण्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी कुरापती करून या प्राधिकरणाच्या व्यवस्थापनावर आप्तस्वकीय अभियंत्यांची वर्णी लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

नवीन यंत्रणाही उभारली
ठेकेदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने कायम केले आहे. याशिवाय कंपनी व्यवस्थापनाने दोन किलोमीटरची नवीन पाईपलाईन टाकली आहे. एक नवा पंपहाऊस उभा केला असून वाया जाणारे पाणी प्रक्रिया करून पुन्हा वापरण्यास योग्य करण्यासाठी प्रकल्पही उभारला आहे.
जिल्ह्यात सुरळीत पाणीपुरवठा करणारी कंपनी म्हणून आता महापालिकांचा या प्राधिकरणावर विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याकडून थकीत बिलासह दर महिन्याची पाणीपट्टीदेखील वेळेवर मिळत आहे.
कंपनीचे आर्थिक उत्पन्न वाढत असल्यामुळे या सोन्याची अंडी देणाºया कंपनीवर आपला निकटवर्ती व्यवस्थापक घुसवण्यासाठी राजकारण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सध्याच्या व्यवस्थापनाविरोधात यानात्या कारणाने कुरापती काढण्यास सुरुवात केली आहे.

२८० कोटी रुपयांचा नफा
दैनंदिन पाणीपुरवठा करणाºया या कंपनीकडे जिल्ह्यातील अन्यही गावांच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. स्टेम प्राधिकरणाची स्थापना २०११ ला झाली असता, त्यावेळी प्राधिकरणाकडे १७० कोटी रुपयांची मालमत्ता होती. पण अवघ्या तीन वर्षांत, म्हणजे २०१४ पर्यंत कंपनी डबघाईला येऊन ३० कोटींवर तग धरून उभी होती. आता कंपनी २८० कोटी रुपयांच्या नफ्यात आहे. भिवंडी महापालिका दरमहा एक कोटी रुपयांच्या पाणीबिलासह थकीत रक्कम महिन्याकाठी देत आहे. पुढील वर्षभरात कंपनीची ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता होणार आहे.

Web Title: Politicians eye's on 400 crore stem authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे