मराठी माणसांच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाकारली; अनेकांना नोटिसा आणि धरपकडीचे प्रयत्न
By धीरज परब | Updated: July 8, 2025 00:44 IST2025-07-08T00:44:14+5:302025-07-08T00:44:34+5:30
महायुतीचे पक्ष सोडून अन्य विविध पक्ष, संघटना , संस्थांनी मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी ८ जुलै रोजी मोर्चा काढण्याचे जाहीर केले.

मराठी माणसांच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाकारली; अनेकांना नोटिसा आणि धरपकडीचे प्रयत्न
मीरारोड- मराठी भाषेवरून मनसैनिकांनी व्यापाऱ्यास मारहाण केल्याच्या निषेधार्थ शहरातील राजस्थानी - मारवाडी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चात मराठी माणसां बद्दल आक्षेपार्ह्य आणि धमकीवजा भाषा व्यापाऱ्यांनी वापरली होती. त्यानिषेधार्थ महायुतीचे पक्ष सोडून अन्य विविध पक्ष, संघटना , संस्थांनी मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या अस्मितेसाठी ८ जुलै रोजी मोर्चा काढण्याचे जाहीर केले. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारतानाच एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या नोटिसा बजावत कारवाईचे इशारे देत मीरारोड मध्ये शक्ती संचलन पोलिसांनी केले. तर मराठी माणसांचा मोर्चा निघणारच असे विविध पक्ष, संघटनांनी निर्धार व्यक्त करत सरकार हे पोलिसांच्या दडपशाहीने मराठी माणसांवर किती अन्याय - अत्याचार करतेय हे संपूर्ण राज्याला दिसायला हवे असे म्हटले आहे.
मीरारोड मध्ये एका मारवाडी समाजाच्या दुकानदाराने मराठी येत नसल्यासह राज्यात सर्व भाषा बोलल्या जातात असे म्हटल्या वरून मनसैनिकांनी मारहाण केली. भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी ह्या प्रकारचा निषेध करत आपण व्यापाऱ्यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. काशीमीरा पोलिसांनी मनसैनिकांवर गुन्हा दाखल करत प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर व्यापाऱ्यांनी मनसेच्या मारहाणीच्या निषेधार्थ मीरारोड मध्ये मोठा मोर्चा काढला. त्यात भाषणात काहींनी मराठी माणसां बद्दल धमक्या आणि आक्षेपार्ह्य वक्तव्ये केली.
व्यापाऱ्यांच्या मोर्चा आणि मराठी माणसांना धमक्या दिल्याच्या विरोधात पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना निवेदन देत ८ जुलै रोजी मोर्चा काढणार असे जाहीर केले. सोमवारी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ऍड. विक्रम तारेपाटील, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख व प्रदीप सामंत, मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे, सचिन पोपळे, जिद्दी मराठाचे प्रदीप जंगम आदींसह मराठी संस्था, संघटना यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात मराठी माणसांचा मोर्चा हा निघणारच असा निर्धार जाहीर केला. पत्रकार परिषदेतच पोलिसांनी जाधव व राणे यांना मीरा भाईंदर शहरात प्रवेश बंदीची नोटीस दिली.
मनसे सह अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे एकाच पदाधिकाऱ्यास वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. सचिन पोपळे यांना तर शहरातील तब्बल ६ पोलीस ठाण्यातून नोटीस दिल्या गेल्या आहेत. संदीप राणे हे शहरातील मतदार असून देखील काशीमीरा पोलिसांनी राणे यांना शहरात येण्यास बंदी घातली आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्याचे प्रयत्न पोलिसांनी चालवले आहेत असा आरोप मनसे पदाधिकारी यांनी केला आहे.
पोलीस उपायुक्त गायकवाड यांनी देखील मोर्चाला परवानगी दिली नसून कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच मनसे, एकीककरण समितीच्या निवेदनावर आधीच कारवाई सुरु केल्याने मोर्चा काढू नये असे आवाहन केले आहे.
व्यापाऱ्यांनी बेकायदा मोर्चा काढला, मराठी माणसांना धमकावले तेव्हा पोलिसांनी त्यांच्या समोर लाचारी पत्करत व्यापाऱ्यांच्या चरणी जाऊन निवेदन घेतले. मात्र मराठी माणसांच्या व भाषेच्या सन्माना साठी काढल्या जाणाऱ्या मराठी माणसांच्या मोर्चाला सरकार आणि भाजपाच्या स्थानिक नेत्याच्या दबावाखाली पोलिसांच्या दडपशाहीने दाबून टाकण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत असा आरोप मनसेचे संदीप राणे यांनी केला आहे.
सरकारची व पोलिसांची मराठी माणसांना हुकूमशाहीने चिरडण्यासाठी चाललेली दादागिरी हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगातील सर्व मराठी माणसे व मराठी भाषा आपली समजणाऱ्या लोकांना दिसावे म्हणून मंगळवारी मोर्चा काढणारच असा निर्धार मराठी माणसांनी केला असल्याचे एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख म्हणाले.
व्यापाऱ्यांनी मागितली माफी
मराठी माणसांच्या संताप आणि मोर्चा चा इशारा दिल्या नंतर मीरा भाईंदर व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी उपायुक्त गायकवाड यांना भेटून निवेदन दिले. आमचा मोर्चा कोणत्याही समाज, पक्ष व भाषा विरोधात नव्हता. व्यापारी मोर्चात जमलेल्या कोणा व्यक्ती कडून कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही व्यापारी संघाच्या वतीने क्षमा याचना करतो असे नमूद करत माफी मागितली आहे.