ट्रेड विथ जॅझच्या समीर नार्वेकर याच्यासह तिघांच्या पाेलीस काेठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:38 IST2026-02-09T22:38:30+5:302026-02-09T22:38:59+5:30
पाेलीस बंदाेबस्तात न्यायालयात केले हजर: आराेपीला ताब्यात देण्याची गुंतवणूकदारांची मागणी...

ट्रेड विथ जॅझच्या समीर नार्वेकर याच्यासह तिघांच्या पाेलीस काेठडीत वाढ
ठाणे: राज्यभरातील ११ हजार गुंतवणूकदारांची १२०० काेटींची फसवणूक करणाऱ्या ट्रेड विथ जॅझ ( टीडब्ल्यूजे ) च्या कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर, त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि अमित पालम या तिघाना १२ फेब्रुवारी पर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणेन्यायालयाने दिले आहेत. साेमवारी पाेलीस काेठडीची मुदत संपल्यानंतर माेठया पाेलीस बंदाेबस्तामध्ये या तिघांनाही ठाणे न्यायालयात आणले हाेते.
आराेपीला आमच्या ताब्यात द्या, अशी घाषणाबाजी न्यायालयाबाहेर जमलेल्या ५० ते ६० गुंतवणूकदारांनी केली. नार्वेकर दाम्पत्याला गुजरातमधून ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने २९ जानेवारी २०२६ राेजी अटक केली. टीडब्ल्यूजे कंपनीने राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चिपळूण, पुणे, यवतमाळसह अनेक शहरांत गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात फरार असलेल्या नार्वेकर दाम्पत्याचा गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे पाेलिसांकडून शाेध सुरू हाेता.
९ फेब्रुवारी राेजी यातील आराेपींच्या पाेलीस काेठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना दुपारी न्यायालयात हजर केले जाणार हाेते. याची माहिती मिळाल्यामुळे सकाळपासूनच ठाणे आर्थिक गुन्हे शाखा आणि ठाणे न्यायालयाच्या बाहेर यातील गुंतवणूकदारांनी माेठी गर्दी केली हाेती. नार्वेकर याच्या कंपनीची ४७ बॅंक खाती तसेच त्यांची वैयक्तीक दाेन खाती गाेठविण्यात आली असून स्वीफ्ट काेड असलेले एका खात्याचीही ठाणे पाेलिसांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी बाहेर देशात यातील गुंतवणूकीतील पैसे पाठविले किंवा कसे? याचीही माहिती घेण्यात येत आहे. काही स्थावर मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रीया सुरु असून एक वाहनही जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पेालीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांनी न्यायालयात दिली.
आराेपीच्या पुण्यातील घरातून काही कागदपत्रे, पासपाेर्ट तसेच काही खात्यांचे पासवर्डसह इतरही चाैकशी सुरु असल्याने आराेपींच्या पाेलीस काेठडीमध्ये वाढ करण्याची मागणी पाेलिसांनी केली. त्यावर ही मागणी मान्य करुन तिन्ही आराेपींच्या पाेलीस काेठडीमध्ये वाढ करण्यात आली.