ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडासह दोघांना तलवारीसह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 21:12 IST2020-02-26T21:05:09+5:302020-02-26T21:12:48+5:30
वागळे इस्टेट हाजूरी भागात तलवारीसह धुमाकूळ घालीत दहशत पसरविणाऱ्या अनिकेत आमले ऊर्फ आन्या (३५) आणि त्याचा साथीदार विक्र म सिंग (२६) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून एक तलवारही ह्रस्तगत करण्यात आली आहे.

दहशत पसरविल्याचा व्हिडीओ व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला अनिकेत संजय आमले ऊर्फ आन्या (३५) आणि त्याचा साथीदार विक्र म अच्छेवार सिंग (२६, रा. आनंद पार्क, रघुनाथनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना तलवारीसह वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली.
वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण हे २४ फेब्रुवारी रोजी वागळे इस्टेट परिमंडळात रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी वागळे इस्टेट, हाजुरी सर्कल येथे काहीजण हत्यारांसहित फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. ती मिळाल्यानंतर आपल्या पथकासह पठाण हे घटनास्थळी गेले. तिथे अनिकेत आणि विक्रम या दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. विक्रम याच्याकडून तलवार हस्तगत केली. त्याच्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ सह महाराष्ट्र कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याच्यासोबत असलेला गुंड अनिकेत याला वागळे इस्टेट पोलिसांनी २९ सप्टेंबर २०१८ रोजी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
* कारवाई करूनही काढली तलवार
ठाण्याच्या हाजुरी भागात राहणारा गुंड अनिकेत हा गेल्या दीड वर्षांपासून हद्दपार असूनही त्याची या भागात प्रचंड दहशत आहे. तो आपल्या साथीदारासह तलवार घेऊन फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
* इतरही गुंडांची दहशत
हाजुरी भागात सोनू पाल आणि सचिन कान्या या दोन गुंडांनीही धुमाकूळ घातला आहे. तलवारीसारखे शस्त्र घेऊन ते या परिसरात दहशत माजवित असल्याचा मेसेज व्हायरल झाल्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे. त्यांच्यावरही कारवाईची मागणी स्थानिक रहिवाशांनी वागळे इस्टेट पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या गुंडांवरही लवकरच कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण यांनी सांगितले.