भिवंडीतील ड्रग्ज माफियाला पोलिसच देताहेत अभय! खा. सुरेश म्हात्रे यांचा आरोप
By सुरेश लोखंडे | Updated: September 28, 2025 11:49 IST2025-09-28T11:49:01+5:302025-09-28T11:49:25+5:30
मुंबईला पळून गेलेला ड्रग्ज माफिया पाेलिस अधिकाऱ्यांना माहीत असून त्याला पोलिसांचेच अभय आहे, असा आराेपही त्यांनी केला.

भिवंडीतील ड्रग्ज माफियाला पोलिसच देताहेत अभय! खा. सुरेश म्हात्रे यांचा आरोप
सुरेश लाेखंडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भिवंडी शहर सध्या ड्रग्जच्या विळख्यात सापडले असून, अनेक तरुणांना या विषारी जाळ्यात अडकवणाऱ्या ड्रग्ज माफियांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खा. सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी केली. मुंबईला पळून गेलेला ड्रग्ज माफिया पाेलिस अधिकाऱ्यांना माहीत असून त्याला पोलिसांचेच अभय आहे, असा आराेपही त्यांनी केला.
‘भिवंडीतील अनेक लहान मुले महामार्गावरून होणाऱ्या ट्रकच्या वाहतुकीच्या माध्यमातून ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात एक महिला भेटली. तिचा १७ वर्षांचा मुलगा ड्रग्जच्या आहारी गेला होता. भिवंडीत ड्रग्स पुरवठा करणारा मुख्य डीलर मुंबईला पळून गेला असून, अजूनही त्याचे काही साथीदार भिवंडीमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्यावर तत्काळ कारवाई करा आणि भिवंडी शहराला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवा’ असे साकडे म्हात्रे यांनी घातले.
सभागृह अवाक्
पालकमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाेलिसांनी तत्काळ कठोर कारवाईचे आदेश दिले. भिवंडीतील ड्रग्ज डिलरची माहिती पाेलिसांना असल्याचे म्हात्रे त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून देताच सभागृह अवाक् झाले.
भिवंडीतील ट्रक पार्किंग प्रकल्पाचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे प्रलंबित आहे. शासनाने या प्रकल्पात ४० टक्के सहकार्य करावे’, अशी मागणी त्यांनी केली. वराळादेवी तलाव प्रकल्पाला केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासन व भिवंडी महापालिकेने निधी देण्याची मागणीही म्हात्रे यांनी केली.
परिस्थिती विदारक आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलेही ड्रग्जच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे ड्रग्ज माफियाला गजाआड करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, ड्रग्ज माफियाला पोलिसांचे अभय असल्याचा आरोप त्यांनी केला.