'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 17:06 IST2025-08-16T17:03:19+5:302025-08-16T17:06:01+5:30
Eknath Shinde Latest News: ठाण्यातील टेम्भी नाक्यावरील दिघे यांच्या मनाच्या हंडीला त्यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
ठाणे : तीन वर्षापूर्वी आम्ही विकासाचे थर लावले आणि विकासाची हंडी फोडली. मात्र विरोधकांनी विकास विरोधी थर लावले मात्र त्यांची ही हंडी महाराष्ट्रामधील जनेतने फोडून टाकली, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ठाण्यातील टेम्भी नाक्यावरील दिघे यांच्या मनाच्या हंडीला त्यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यापुढेही आपल्याला विकासाचे थर लावायचे असून ठाण्यासह राज्याचा विकास करायचा असल्याचे ते म्हणाले.
'आम्ही २३२ थर लावून आमदार निवडून आणले'
विधानसभेची हंडी महायुती फोडणार असे मी म्हणालो होतो आणि आम्ही २३२ थर लावून आमदार निवडून आणले आणि विजयाची हंडी फोडली. पहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानची हंडी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय लष्कराने फोडली. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. आता पाकिस्तानने पुन्हा थर लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कायमची हंडी फोडून टाकायची असल्याचेही ते म्हणाले.
ठाणे ही गोविंदाची पंढरी
दरवर्षी हजारो गोविंदा हे दिघे यांच्या या हंडीच्या ठिकाणी येतात आणि सलामी देऊन पुढे जातात. आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला आणि सातासमुद्रापार नेला. त्यामुळे ठाणे ही गोविंदाची पंढरी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवघेणी स्पर्धा नसते. येथे सर्व गोविंदाची काळजी घेतली जाते. दिघे यांची मनाची आणि सोन्याची हंडी आहे, आणि आमचे सोने हेच आमचे गोविंदा आहेत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद मुळे मी मुख्यमंत्री झालो आणि सण उत्सवावरील असलेली बंधने आम्ही काढून टाकली असल्याचेही ते म्हणाले.