Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 23:13 IST2025-08-05T23:08:07+5:302025-08-05T23:13:57+5:30
Palghar News: पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कंपनीतील कामगारांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर कामगारांनी आंदोलन करत मालकिणीची कार अडवली.

Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं?
पालघर पूर्व वेवूर येथील मस्तांग इंटरप्राईजेस या कंपनीतील कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे कामगारांनी आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान कामगारांनी मालकिणीची कार अडवली. त्यामुळे संतप्त झालेल्या कंपनी मालकिणीने स्वतः ड्रायव्हर सीटवर बसून आंदोलनकर्त्या कामगारांच्या अंगावर कार घातली. या घटनेत विद्या यादव (वय २७ वर्ष) या जखमी आहेत. त्यांना पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पालघर पूर्व येथील प्लॉट नंबर 9 आणि 10 सर्वे नंबर 33 वेवूर येथील मस्तांग इंटरप्राईजेस ही सॉक्स आणि ॲक्सेसरीज बनवणारी कंपनी असून या कंपनीत मागील तीन ते 14 वर्षापासून काम करणाऱ्या वीरेंद्र नगर, घोलवीरा, सफाळे, वीरेंद्र नगर घोलवीरा, सफाळे सातपाटी मासवन, वरखुंटी येथील सुमारे 45 कामगारांना ८ तासाऐवजी १२ तास काम करावे लागेल अशा सूचना देण्यात आल्या.
कामगारांचे प्रकरण का वाढले?
महिलांना दुपारी तीन ते रात्री अकरा वाजेपर्यंत काम करण्याच्या सूचना देण्यात आली. यावर कामगारांनी आपला विरोध दर्शविल्याने रविवार पासून गेटवर असताना ४५ पुरुष आणि महिला कामगारांना कामावर घेण्यास नकार देण्यात आला.
कामगारांनी आपल्याला कुठली पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्याबाबत कंपनी व्यवस्थापनाला फोन करून विचारले. तुम्हाला कामावर घेण्यास व्यवस्थापकाकडून मज्जाव करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे, असे त्यांना सांगण्यात आले. हे सर्व कामगार सत्ताधारी शिवसेना पक्षांचे पदाधिकारी सुशील चुरी यांच्या न्यू हिंदुस्तान कामगार सेनेचे सदस्य आहेत.
मालकिणीने कार कामगारांवर घालण्यापूर्वी काय घडले?
मंगळवारी (५ ऑगस्ट) हे सर्व कामगार मस्तांग इंटरप्राईजेस या कंपनीच्या समोर कंपनी व्यवस्थापनाशी बोलण्यासाठी एकत्र जमले. त्यावेळी कंपनीच्या मालक नाजनीन कात्रक ऑफिसमधून कारने बाहेर पडताना दिसल्या. ते पाहून आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, असे म्हणत कामगारांनी कार थांबवली.
आपली कार थांबविल्याने संतप्त झालेल्या नाजनीन कात्रक यांनी आपल्या ड्रायव्हरला खाली उतरायला सांगून कारचा ताबा घेतला. यावेळी कारच्या समोर असलेल्या कामगारांच्या अंगावर त्यांनी कार घातली. यावेळी कारच्या समोर असलेल्या सफाळे येथील विद्या रामकुमारी यादव (२७) या जखमी झाल्या. त्यांच्या पायावरून कार गेली.
व्हिडीओ बघा
पालघर : वेवूर येथील मस्तांग इंटरप्राईजेस या कंपनीतील कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले. कामावरून काढल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी कामगारांनी कार अडवली म्हणून कंपनीच्या मालकिणीने थेट अंगावरच कार घातली. #palghar#maharashtra#viralvideo… pic.twitter.com/AHLPPYbUi8
— Lokmat (@lokmat) August 5, 2025
त्या मागील ४ वर्षापासून कंपनीत काम करत आहेत. कार पायावरून गेल्याने त्या जागीच बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात उशिरापर्यंत जबाब घेण्याचे काम सुरू असून अजूनही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी लोकमतला सांगितले.
मस्तांग कंपनीच्या व्यवस्थापक नाजनीन कात्रक यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी कंपनी कार्यालयात संपर्क करण्यात आला. त्यावेळी कंपनी मालक आल्यानंतर आपल्याशी संपर्क साधला जाईल, असे कंपनीतील सुरक्षा रक्षकांनी लोकमतला सांगितले.