पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 05:51 IST2025-04-16T05:50:58+5:302025-04-16T05:51:53+5:30

सागपाणी व रिठीपाडा गावात दरवर्षीप्रमाणे डिसेंबर अखेरपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत.

Palghar: Women flock to fill pots of water in Jawhar taluka, severe water shortage | पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे

पालघर: जव्हार तालुक्यात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड, विहिरीवर भांडणे

जव्हार : जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात दादरा नगर हवेली व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाणी व रिठीपाडा गावात हंडाभर पाणी भरण्यासाठी महिलांची झुंबड होताना दिसत आहे. कधीतरी येणाऱ्या एखाद्या टँकरवर महिला चढून पाणी मिळविण्यासाठी धडपडताना दिसतात.

सागपाणी व रिठीपाडा गावात दरवर्षीप्रमाणे डिसेंबर अखेरपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत. परिणामी, गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण होत आहे. 

विहिरीवर भांडणे

छोट्या पिकअपच्या आकाराचा टँकर सात-आठ दिवसांतून एकदा येतो, तेव्हा हंडाभर पाण्यासाठी महिला विहिरीवर हंड्यांची रांग लावतात. मात्र, हंडाभर पाणीही मिळत नसल्याने महिला  टँकरवर चढतात.  महिलांमध्ये पाण्यावरून भांडणेदेखील होत आहेत. 

गावकऱ्यांत रोष

पाणीटंचाई पाहता वावर वांगणी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद बुधर व सामाजिक कार्यकर्ता सुनील जाबर यांनी गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते यांना भेटून मोठ्या टँकरची मागणी केली होती. मात्र, अद्याप मोठ्या टँकरने पुरेसा पाणीपुरवठा सुरू झालेला नसल्याने गावकऱ्यांनी रोष व्यक्त केला. 

महिना उलटून गेला, पाइप जोडणी झाली नाही

येथील जल जीवन मिशनचे काम अपूर्ण असल्याने संबंधित कंत्राटदाराने १०-१२ दिवसांपूर्वी स्वतःचे टँकर मागवून पाण्याची व्यवस्था करून दिली होती. 

मात्र, प्रशासनाकडून अद्याप टँकर सुविधा दिली जात नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला. काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा अभियंता राजेश पाध्ये यांच्याशी ग्रामस्थांनी संपर्क केला असता नवीन नळपाणी योजनेचे पाइप जोडणे बाकी आहे. 

चार-पाच दिवसांत ते काम पूर्ण होईल आणि पाणी सुरळीत सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, महिना उलटला तरी पाइपजोडणी झालेली नाही.

Web Title: Palghar: Women flock to fill pots of water in Jawhar taluka, severe water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.