One or two railroad worms | रेल्वेच्या एक ना धड भाराभर चिंध्या
रेल्वेच्या एक ना धड भाराभर चिंध्या

ठाणे ते बदलापूर तसेच टिटवाळापर्यंतच्या रेल्वे प्रवाशांना स्थानकात मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी मध्य रेल्वे, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने कंबर कसली आहे. त्याचा एक भाग म्हणून सर्वच स्थानकांमध्ये सध्या पादचारी पुलाची दुरूस्ती, तर कुठे नवीन पूल उभारण्याची कामे सुरू आहेत. त्याकरिता फलाटांवर खोदलेले खड्डे, फलाटांवर ठेवलेले लोखंडी साहित्य, ठिकठिकाणी मारलेले पत्रे यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. छतांवरील काढलेल्या पत्रांमुळे उन्हात उभे राहण्याची शिक्षाच त्यांना मिळाली आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वीच ही कामे न झाल्यास प्रवाशांना अडथळ््यांची शर्यत पार करावी लागणार आहे. प्रशासनाने एकाचवेळी सर्वच स्थानकात कामे हाती घेतल्याने एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था सर्वत्र पाहायला मिळत आहे. याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे ‘लोकमत’चे प्रतिनिधी आमोद काटदरे, पंकज रोडेकर, पंकज पाटील यांनी...
सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल पाडण्याचे काम सध्या सुरू आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने साधारण १९८० च्या दशकात उभारलेला हा पूल सध्या अपुरा ठरू लागला होता. गर्दीच्या वेळेस सर्वच फलाटांमध्ये गाड्या आल्यास या पुलावर गर्दी होत असे. पूर्व-पश्चिमेला ये-जा करण्यांचीही त्यात भर पडत होती. त्यामुळे अनेकदा पुलावर चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवत असे. हा पूल जीर्ण झाल्याने रेल्वे प्रशासनाने एप्रिलमध्ये पूल पाडण्याचे काम हाती घेतले. मात्र, ते कधीपर्यंत पूर्ण करायचे याची निश्चित डेडलाइन जाहीर केलेली नाही. त्यामुळे काम नियोजित वेळेनुसार सुरू आहे का, असा प्रश्न प्रवाशांच्या मनात येतो.
रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक, प्रवाशांची वर्दळ हे सारे संभाळून पूल पाडण्याचे काम करणे हे साहजिकच अवघड आहे. परंतु, आता मे महिना संपायला आला तरी अजून पूल पाडून झालेला नाही. सध्या होम प्लॉटफॉर्मवरील या पुलाची कल्याण दिशेकडील एक बाजू पूर्णपणे पाडली आहे. पुलाचा लोखंडी सांगाडा, पायºया व त्यावरील काँक्रिट हे उचलून नेण्यासाठी दररोज ट्रक चक्क या फलाटाच्या आवारातच आणला जातो. तर, दुसºया बाजूला बुकिंग आॅफिससमोर उतरणाºया पायºया अजूही पाडलेल्या नाहीत. फलाट क्रमांक २ वरील पायऱ्यांबाबतही तीच परिस्थिती आहे. नागरिकांना तेथे मज्जाव करण्यासाठी पायºयांना पत्रे ठोकण्यात आले होते. मात्र, शनिवारी तेथे पत्रे नसल्याचे आढळून आले. शिवाय या पायºयांखाली विद्युत डीपी असल्याने काम करताना सावधानता बाळगावी लागणार आहे. फलाट ३-४ वरील पुलाच्या दोन्ही बाजूंकडील पायºया तोडून झाल्या आहेत. फलाट क्रमांक ५ वर उतरणाºया काही पायºया तोडल्या आहेत. पुलावरील काही भाग अजूनही पाडणे बाकी आहे. पूल बंद असल्याने सध्या पूर्वेला असलेल्या लिफ्टमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. तर, पश्चिेमतील लिफ्ट पुलाच्या कामामुळे बंद असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
कल्याण दिशेकडील पादचारी पूल हा दोन्ही बाजूस केडीएमसीने बांधलेल्या स्कायवॉकला जोडलेला आहे. पश्चिमेकडील मच्छीमार्केट येथील स्कायवॉकवर छत टाकण्याचे आणि लाद्या बदलण्याचे काम केडीएमसीने मार्चअखेरीस पूर्ण केले होते. एप्रिलमध्ये तो खुला होणार तितक्यात रेल्वेने त्यांच्या हद्दीतील पुलाचे काम हाती घेतले. त्यामुळे अगोदरही पश्चिमेतील प्रवाशांना स्कायवॉकवरून थेट फलाट गाठता येत नव्हते. आताही रेल्वेच्या कामामुळे त्यांचे हाल होत आहेत. यावरून रेल्वे आणि केडीएमसी यांच्यात पुलाच्या कामाबाबत समन्वय नसल्याचे दिसून येते. दोन्ही यंत्रणांनी एकाचवेळी आपापल्या हद्दीतील पुलांची कामे केली असती तर, ते अधिक सोयीचे ठरले असते.
जूनमध्ये पावसाळ्याला सुरुवात होईल. त्यावेळी अनेकदा गाड्या विलंबाने धावतात. त्यामुळे प्रवासी पुलावरच उभे असतात. मधल्या पुलावर प्रवासी वाढल्यास तेथे चेंगराचेंगरी होण्याची भीती व्यक्त होत आहे.हा पूल पावसाळ्यापूर्वी खुला करावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.
>ठाकुर्लीत आणखी एका पुलाचे काम
ठाकुर्ली स्थानकाचा दोन वर्षांपूर्वी कायापालट करण्यात आला. त्यावेळी कल्याण दिशेला नवीन प्रशस्त पादचारी पूल उभारण्यात आला. त्यामुळे रेल्वे समांतर रस्ता, ९० फुटी रस्ता परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला. रूळांतून स्थानक गाठण्यासाठी त्यांची होणारी पायपीट बंद झाली. त्यानंतर याच स्थानकातील रेल्वे फाटक बंद झाल्यावर रेल्वेने तेथे भिंत बांधली. त्यामुळे प्रवाशांपुढे जुना पूल गाठून स्थानकात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र, हा पूल व त्याच्या पायºया अरूंद असल्याने गर्दीच्यावेळी तेथून ये-जा करताना प्रवाशांना अडचणीचे ठरत आहे. हा पूल जीर्ण झाल्याने गाड्या आल्यावर त्याला हादरे बसतात. शिवाय हा पूल होम प्लॅटफॉर्मला जोडलेला नाही. त्यामुळे रेल्वेने त्याला समांतर नवीन पूल बांधण्याचे काम काही महिन्यांपासून हाती घेतले आहे. सध्या त्यासाठी होम प्लॅटफॉर्म ते फलाट दोनपर्यंत गर्डर टाकण्यात आला आहे. तर पूर्वेला पिलर उभारले आहेत. मात्र, त्यावर गर्डर टाकलेला नाही. फलाटावर खोदकामासाठी पत्रे ठोकल्याने लोकल आल्यावर प्रवाशांना येजा करणे अवघड होत आहे. हा पूल दोन वर्षांपूर्वी व्हायला हवा होता.
>टिटवाळ्यात दोन पुलांची कामे
टिटलाळ््यात अस्तित्त्वात असलेला एकमेव पादचारी पूल अपुरा पडत आहे. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तो १९६८ मध्ये बांधला. हा पूलही सरळ एका रांगेत नाही. मध्यंतरी या पुलाखाली प्लास्टर पडले होते, असे माहितगारांनी सांगितले. त्यामुळे या पुलाशेजारी नवीन पूल बांधण्यात येत आहे. त्याकरिता पश्चिमेला आणि फलाट १ ते ३ वर बांधकाम सुरू झाले आहे. फलाट क्रमांक ३ वर खड्डा खोदण्यात आला आहे. तसेच फलाट १ व २ वरील छताचे पत्रे काढल्याने प्रवाशांना उन्हाचा सामाना करावा लागत आहे.
>दिवा स्थानकात अडथळ्यांची शर्यत
दिवा स्थानकात आठ फलाट आहेत. सध्या फलाट क्रमांक ५-६ वर छत उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी लोखंडी साहित्य ठेवले आहे. तर, फलाट ७ व ८ वर लाद्या बसवण्याचे काम जोरात सुरू आहे. मात्र, या साहित्याचा प्रवाशांना अडसर होत आहे. स्थानकातील मधला पूल एका रांगेत सरळ थेट फलाटांना जोडत नाही. तो फलाटांनुसार मागेपुढे आहे. हा पूल पूर्वेला आणि फलाट ७-८ तसेच अन्य फलांटाकडे जाणाºया पुलाच्या भागाशी जोडण्यात येत आहे. त्याचे काम सुरू असल्याने त्याची एक बाजू बंद आहे. तर, दुसरी बाजू खुली आहे.
>मुंब्रा-कळवा
मुंब्रा-कळवा स्थानकात सध्या नवीन दोन फलाट उभारण्याचे काम जोमात सुरू आहे. पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम मार्गी लागल्यावर ते प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील.

Web Title: One or two railroad worms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.