रमजानची न्याहारी करणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, गॅलरीचा सज्ज कोसळून एक ठार दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 21:03 IST2022-04-10T21:03:13+5:302022-04-10T21:03:33+5:30
अनधिकृत व धोकादायक इमारतींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात सकाळी सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

रमजानची न्याहारी करणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, गॅलरीचा सज्ज कोसळून एक ठार दोन जखमी
भिवंडी :अनधिकृत व धोकादायक इमारतींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात सकाळी सहा वाजताच्या सुमारास एक लोड बेरिंग इमारतीच्या गॅलरीचा सज्जा कोसळून एक ठार तर दोन जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकुर्ती गंभीर आहे.भिवंडी शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरात रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली आहे.
गौसिया मस्जिद परिसरात मैनुद्दीन अली अन्सारी यांच्या मालकीचे तळ अधिक एक मजला असे लोड बेअरिंग घर असून सकाळी सहा वाजताच्या सुमारास या घराच्या गॅलरीचा सज्जा शेजारील घरावर पडण्याची दुर्घटना घडली. रमजान महिना असल्याने सकाळी शेहरीची न्याहारी करण्यासाठी अनेक जण पहाटे लवकर उठून कामास लागत असतात. त्यावेळी ही दुर्घटना घडल्याने या दुर्घटनेत गुलशन सगिर अन्सारी वय ४५ या महिलेचा मृत्यू झाला तर सगीर अन्सारी वय ४५ व मेहताब अन्सारी असे दोघे जखमी झाले आहेत.
सदर दुर्घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्कालीन पथक, अग्निशमन दल, मनपा अधिकारी कर्मचारी वैद्यकिय पथका सह घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केले .पथकाने मदत कार्य करीत मयत महिलेचा मृतदेह बाहेर काढून शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.तर दोन जखमी व्यक्तींना प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे .