महावितरणच्या १३९७ ग्राहकांचे दीड कोटींचे धनादेश बाउन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:12 IST2020-02-20T00:12:07+5:302020-02-20T00:12:13+5:30
अधिकाऱ्यांची माहिती : दंडाची रक्कम बिलातून करणार वसूल

महावितरणच्या १३९७ ग्राहकांचे दीड कोटींचे धनादेश बाउन्स
डोंबिवली : कल्याण परिमंडळातील ८० हजार लघुदाब वीजग्राहकांनी जानेवारीत धनादेशाद्वारे ७४ कोटी १० लाख रुपयांचे वीजबिल भरले. यामध्ये १३९७ ग्राहकांचे एक कोटी ५५ लाखांचे धनादेश विविध कारणांनी वटलेच नाहीत. या ग्राहकांना ७५० रुपये आणि त्यावरील जीएसटी किंवा बँक चार्जेस यापैकी जास्त असलेली रक्कम दंड भरावा लागणार आहे. फेब्रुवारीच्या वीजबिलातून याची वसुली करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
धनादेश न वटल्याने संबंधित ग्राहकांची ही सुविधा खंडित करण्यात येणार आहे. या ग्राहकांनी आॅनलाइन वीजबिल भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी धनादेश वटणे आवश्यक असते. त्यानंतरच बिलाची रक्कम मिळाल्याची नोंद होते. अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिल भरतात. धनादेश वटण्यासाठी काहीवेळा दोन-तीन दिवस लागतात. त्यामुळे काही ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश न वटल्यास आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. यामुळे ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्टही खराब होत असल्याने वीजबिलाचा भरणा आॅनलाइनद्वारे करावा, असे महावितरणने आवाहन केले आहे.