बुडीत बँकांना पाच लाखांपर्यंतची देणी ९० दिवसांत देण्याचे बंधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 00:40 IST2021-12-13T00:31:19+5:302021-12-13T00:40:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँकिंग क्षेत्रात केलेल्या नव्या कायद्यामुळे आता बँक खातेदारांना त्यांच्या पैशांची हमी ...

केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बँकिंग क्षेत्रात केलेल्या नव्या कायद्यामुळे आता बँक खातेदारांना त्यांच्या पैशांची हमी मिळणार आहे. एखादी बँक दिवाळखोरीत निघाली तर त्यांना पाच लाखांपर्यंतची रक्कम ९० दिवसांत देण्याचा नियम बंधनकारक केला आहे. त्याचा महाराष्ट्रासह देशभरातील बँक खातेदारांना मोठा लाभ होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मत्स्य व्यवसाय तथा दुग्ध व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी रविवारी ठाण्यातील कार्यक्रमात केले.
वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कच्या सभागृहात रुपाला यांच्या हस्ते दिवाळखोरीत निघालेल्या बँकांच्या खातेदारांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी या खातेदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, एकेकाळी बँक ही केवळ व्यावसायिक, उद्योजक आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या ठेवी ठेवण्यासाठी म्हणून ओळखली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या जनधन योजनेमुळे तिची ओळख सर्वसामान्यांसाठीही झाली. त्यामुळेच ४० कोटी ग्राहक बँकांशी जोडले गेले आहेत. जनधन योजनेत खाते उघडण्यासाठी लोकांकडे शंभर रुपयेही नाहीत, याची जाणीव झाल्यानंतर शून्य बचत खात्याद्वारेही जनधनचे खाते उघडण्याची परवानगी दिली. या खात्यांत आता ६० हजार कोटी जमा झाले आहेत.
बँकिंग क्षेत्रात जनतेचा विश्वास निर्माण होण्याचे काम मोदींच्या या योजनेमुळे झाले. याच धर्तीवर डीबीटीची (डायरेक्ट बेनिफिट) योजना राबविली. दिवाळखोरीत निघालेल्या बँकांतून पूर्वी एक लाखाचे विमा कवच दिले जात होते. ते आता वाढवून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी परेश शाह यांना एक लाख ३३ हजार आणि विनोदिनी समेळ यांना पाच लाख रुपये असे दोन धनादेश खातेदारांना रुपाला यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी दिल्ली येथे पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या मार्गदर्शनाची चित्रफीतही याच कार्यक्रमात थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात आली.
१०० ग्राहकांचे पैसे खात्यात जमा
ठाणे जिल्ह्यात या योजनेचे १८५ लाभार्थी असून त्यांना एक कोटी ६५ लाख रुपये दिले जाणार आहेत. यातील सुमारे १०० ग्राहकांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयानंद भारती यांनी दिली. केंद्र सरकारच्या या डीआयसीजीसी योजनेमुळे आपल्याला एक लाख ८० हजार रुपये मिळाले. याचा विशेष आनंद असल्याचे ८४ वर्षीय विनायक जोशी (सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार) यावेळी म्हणाले. याच योजनेमुळे आईवडिलांसह आपली दीड लाखाची रक्कम बँकेत जमा झाल्यामुळे अनिता गंधे यांनीही समाधान व्यक्त केले.