नाल्यांवरील बांधकामांना ठामपाच्या पुन्हा नोटिसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 00:28 IST2019-05-26T00:27:52+5:302019-05-26T00:28:01+5:30
नालेसफाई, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांची सफाई कोणत्याही परिस्थितीत २ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.

नाल्यांवरील बांधकामांना ठामपाच्या पुन्हा नोटिसा
ठाणे : शहरातील नालेसफाई, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांची सफाई कोणत्याही परिस्थितीत २ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. त्याचबरोबर मुख्य रस्ते, सेवारस्ते, उड्डाणपूल याठिकाणी उभी केलेली बेवारस वाहने इतरत्र हलवणे, जीवितहानी टाळण्यासाठी नाल्यांवरील बांधकामांना नोटिसा देण्याबरोबर पावसाळ्याआधी रस्त्यांवरील चरांचे पुनर्पृष्ठीकरण करून कुठलीही दुर्घटना अथवा जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
आयुक्तांनी महापालिकेचे सर्व अधिकारी, मेट्रो, महावितरण, महानगर गॅस, एमएमआरडीए आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक नागरी संशोधन केंद्रात घेऊन मान्सूनपूर्व करावयाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केल्या. तसेच या रस्त्यांवर टेम्पो-रिक्षांचे पार्किंग तत्काळ बंद करून भविष्यात ते होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही वाहतूक पोलिसांना सूचित केले.
कोणत्याही परिस्थितीत विविध कामांसाठी खोदण्यात आलेले रस्ते पूर्वरत करणे, खड्डे बुजवणे, विटावा येथे उच्चक्षमतेचे पंप लावणे, ज्या खोलगट भागात पाणी साचते, त्या भागात आवश्यक ती खबरदारी घेणे तसेच त्याठिकाणी माहितीफलक लावणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
गरज असेल तिथे सीसीटीव्ही कॅमेरे
ज्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी बॅरिकेडिंगमुळे पाणी अडणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी, तसेच त्या ठिकाणचे डेब्रिज तत्काळ उचलावे, असे सांगत शक्य असेल, तर या ठिकाणी पावसाळ्याच्या काळात सीसीटीव्ही कॅमेरे लावता येतील का, याची पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकाºयांना दिल्या.
>औषधसाठ्याची तजवीत करा
पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते बुजवण्यासाठी आधीच एजन्सी निश्चित करावी. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे स्वाइन फ्लू कक्ष सुरू करणे, आवश्यक तो औषधसाठा करणे, इमारत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक ती फवारणी करण्याबाबत विकासकांना पत्र देणे, वृक्षछाटणी करणे, छाटलेल्या फांद्या वेळेत उचलणे आदी कामांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
धोकादायक इमारती खाली करा
पावसाळ्यात नाल्यावरील बांधकामे वाहून जाऊन जीवितहानी होऊ नये, यासाठी नाल्यांवरील बांधकामांना नोटिसा देण्याची कार्यवाही करण्याबरोबरच कोणत्याही स्थितीत सी-१ आणि सीटू-ए या इमारती खाली करण्याचे आदेश त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले.