रॅगिंगप्रकरणी नऊ विद्यार्थ्यांचे सहा महिन्यांसाठी निलंबन; वसतिगृहातूनही बेदखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 08:50 AM2023-10-05T08:50:35+5:302023-10-05T08:52:03+5:30

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील घटना

Nine students suspended for six months in ragging case; Evicted from the hostel too | रॅगिंगप्रकरणी नऊ विद्यार्थ्यांचे सहा महिन्यांसाठी निलंबन; वसतिगृहातूनही बेदखल

रॅगिंगप्रकरणी नऊ विद्यार्थ्यांचे सहा महिन्यांसाठी निलंबन; वसतिगृहातूनही बेदखल

googlenewsNext

ठाणे : महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात, एमबीबीएसला नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग केल्याप्रकरणी  प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंधक नियमावलीनुसार कारवाई करण्यात आली आहे. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बेदखल करण्यात आले आहे, तसेच त्यांना एका शैक्षणिक सत्रासाठी महाविद्यालयामधून निलंबित करण्यात आले आहे.

वसतिगृहात रॅगिंग झाल्याची तक्रार करणारा ई-मेल सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनीही राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना या ई-मेलद्वारे सूचित करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, अधिष्ठात्यांनी रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या साहाय्याने तपास केला. त्यात नव्याने एमबीबीएससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रथम व द्वितीय वर्षातील एमबीबीएसमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मुलांच्या वसतिगृहात रॅगिंग केले असल्याचे निदर्शनास आले. रॅगिंग प्रतिबंधक समितीने यासंदर्भात कसून चौकशी करून प्रथम व द्वितीय वर्षातील दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. ही कारवाई विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उच्चशिक्षण संस्थांमधील रॅगिंग प्रतिबंधक नियमावली २००९ च्या अधीन राहून करण्यात आली आहे.

कारवाईबद्दल व्यक्त केले समाधान

रॅगिंग प्रतिबंधक नियमानुसार कारवाई पूर्ण करून तसा अहवाल विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्लीला कळविण्यात आला आहे. रॅगिंग प्रतिबंधक नियमानुसार केलेल्या अंमलबजावणीसाठी रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांनी कारवाईबद्दल समाधानी असल्याचे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाला कळविले आहे.

‘कारवाईमुळे अशा प्रकारांना आळा बसेल’

 वसतिगृहात रॅगिंगसारखा प्रकार होतो, ही निंदनीय बाब आहे. याबाबत विहित प्रक्रियेचा अवलंब करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईच्या माध्यमातून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले, तसेच रॅगिंगसारख्या घटना घडू नयेत, यासाठी सर्व विद्यार्थ्यांशी पुन्हा संवाद साधण्यात येत आहे.

तसेच विद्यार्थ्यांचा असा कोणी छळ करत असेल, तर त्याची तत्काळ तक्रार करण्यात यावी, असेही विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्याची माहिती राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी दिली.

Web Title: Nine students suspended for six months in ragging case; Evicted from the hostel too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.