कांदळवनातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला अखेर पालिकेला मिळाला मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 19:31 IST2021-01-05T19:28:57+5:302021-01-05T19:31:07+5:30
Mira Bhayander Municipal Corporation : कांदळवनात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करून डेब्रिसचा भराव केला जात आहे.

कांदळवनातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईला अखेर पालिकेला मिळाला मुहूर्त
मीरारोड - कांदळवनात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा मुहूर्त अखेर मीरा भाईंदर महापालिकेला मिळाला असून मंगळवारी उत्तन भागात खाडी पात्र व कांदळवनातील ३ गाळ्यांचे मोठे बांधकाम तोडण्यात आले. कांदळवनात मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करून डेब्रिसचा भराव केला जात आहे. भूखंड तयार करून अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. खासगी आणि सरकारी जागेतील कांदळवनात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन केले जात आहे. कांदळवनातील बेकायदा बांधकामाबाबत अनेक तक्रारी होऊन देखील महापालिका मात्र कारवाईस चालढकल करत आली आहे.
दरम्यान अतिक्रमण विभागाचा कार्यभार आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे सोपवला आहे. उत्तनच्या करईपाडा भागात दिनीस वाडीकडे जाणाऱ्या नवीखाडीवरील पुलाजवळ खाडीपात्र आणि कांदळवनात नव्याने तीन गाळ्यांचे भले मोठे अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार महापालिका आयुक्तांपर्यंत झाली. आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शना खाली प्रभाग अधिकारी संजय दोंदे व पथकाने मंगळवारी सदरचे ३ गाळ्यांचे मोठे पक्के बांधकाम जेसीबीने जमीनदोस्त केले.
विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण सह पोलीस उपस्थित होते. इतक्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम बांधून पूर्ण होऊन रंगरंगोटी झालेली असताना तक्रार होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे इतके मोठे बांधकाम कोणी केले याची माहिती अजून महापालिकेस झालेली नाही. सदर प्रकरणी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून कांदळवन व खाडी पात्रात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासह बांधकामाचे सर्व डेब्रिस काढून टाकण्याची मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.