पालिका उपायुक्ताला २५ लाखांची लाच घेताना अटक; अतिक्रमण हटविण्यासाठी मागितले होते ५० लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:08 IST2025-10-02T09:07:12+5:302025-10-02T09:08:54+5:30
घंटाळी परिसरातील अतिक्रमणे हटवून मुंबईतील बिल्डरला सहकार्य करण्यासाठी २५ लाखांची लाच घेताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी अटक केली.

पालिका उपायुक्ताला २५ लाखांची लाच घेताना अटक; अतिक्रमण हटविण्यासाठी मागितले होते ५० लाख
ठाणे : घंटाळी परिसरातील अतिक्रमणे हटवून मुंबईतील बिल्डरला सहकार्य करण्यासाठी २५ लाखांची लाच घेताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी अटक केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत नाैपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती.
एसीबीच्या सूत्रांनुसार, मुंबईतील एका बिल्डरची घंटाळी परिसरात जागा आहे. या जागेवर अतिक्रमण होते. ते हटविण्यासाठी पाटोळे यांनी ५० लाखांची लाच मागितली हाेती. यातील दहा लाख बिल्डरने काही दिवसांपूर्वी दिले हाेते. त्यानंतर उर्वरित ४० लाख देण्याआधी त्याने मुंबई एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या विशेष पथकाने बुधवारी सापळा रचून पाटोळे यांना उर्वरित ४० पैकी २५ लाखांची लाच घेताना अटक केली. एसीबी अधिकाऱ्यांनी कार्यालयातील कागदपत्रांची उशिरापर्यंत छाननी केली. त्याचवेळी पाटोळे यांच्या घरी शोध मोहीम राबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर
अतिक्रमणांवरून उच्च न्यायालयाने आयुक्त सौरभ राव यांची ‘हजेरी’ घेतली असतानाही ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे, तोच अधिकारी लाच घेताना पकडला गेला आहे.
वर्धापनदिनीच मोठा धक्का
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू आहेत. न्यायालयाने अनधिकृत बांधकामांवरून आयुक्त राव यांना अक्षरश: धारेवर धरल्यावर ही कारवाई सुरू झाली. मात्र, ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारे हेच अधिकारी असल्याचे आता उघड झाले आहे. कारवाई करण्याकरिता व न करण्याकरिताही लाचेची मागणी होत असल्याचेच संकेत या कारवाईमुळे प्राप्त झाले. योगायोगाने ठाणे महापालिकेचा बुधवारी ४३ वा वर्धापनदिन होता. याच दिवशी ही कारवाई झाल्याने महापालिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसल्याचे बाेलले जात आहे.