भिवंडीत मालमत्ता थकबाकीदारांवर पालिकेची धडक कारवाई; पाणी कपात करीत ३० मोटार पंप जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:44 IST2022-02-14T18:41:22+5:302022-02-14T18:44:03+5:30
Bhiwandi News : सदनिकाधारकांना व इमारत मालकांना मनपा प्रशासनाने वेळोवेळी नोटीस बजावली होती मात्र त्याकडे विकासकाने दुर्लक्ष केल्यामुळे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी स्वतः या मालमत्ता धारकांवर कारवाई केली.

भिवंडीत मालमत्ता थकबाकीदारांवर पालिकेची धडक कारवाई; पाणी कपात करीत ३० मोटार पंप जप्त
नितिन पंडीत
भिवंडी - भिवंडी महानगरपालिकेत मालमत्ता कर वसुली अत्यंत नगण्य असून थकबाकीदारांना कर भरण्यासाठी व्याजदरात सवलत देऊन ही त्यामध्ये सुधारणा होत नसल्याने आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मालमत्ता कर वसुलीसाठी वसुली विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त पालिका मुख्यालयात सर्व विभाग प्रमुख, लिपिक यांना सकाळच्या सत्रात कार्यालया बाहेर वसुलीसाठी रवाना करण्याचा निर्णय घेतला असून सोमवारी उपायुक्त मुख्यालय दीपक झिंजाड यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती क्रमांक चारचे प्रभारी सहाय्यक आयुक्त शमीम अन्सारी, कार्यालय अधीक्षक संजय पुण्यर्थी, कर निरीक्षक महेश लहांगे व पथकातील कर्मचाऱ्यांनी नारपोली गाव भूभाग क्रमांक चार येथील मालमत्ता क्रमांक १५७४ वरील चार इमारतीं मध्ये एकूण १०३ सदनिका असून त्यावरील ३७ लाख ९५ हजार ९९७ रुपये मालमत्ता कर थकबाकी होती.
सदनिकाधारकांना व इमारत मालकांना मनपा प्रशासनाने वेळोवेळी नोटीस बजावली होती मात्र त्याकडे विकासकाने दुर्लक्ष केल्यामुळे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी स्वतः या मालमत्ता धारकांवर कारवाई करीत चार ही इमारतींमध्ये पाणी पुरावठ्यासाठी लावलेल्या तब्बल ३० मोटर पंप जप्त करीत पाणी पुरवठा खंडित केला आहे. तर इमारतीच्या तळमजल्यावर इमारतीचे मालक तथा विकासक मोहम्मद शाहिद इम्तियाज अहमद शेख यांचे कार्यालय व गोडावून सीलबंद केले आहे.
या कारवाईमुळे मालमत्ता कर थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून पालिकेच्या विकास कामांसाठी तथा नागरी सुविधा मिळण्यासाठी पालिकेच्या आर्थिक तिजोरीत नागरीकांनी मालमत्ता कर थकबाकी भरून सहकार्य करणे गरजेचे असल्याने पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरीकांना मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन केले आहे. जे थकबाकीदार मालमत्ता कर भरणा करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई पालिका प्रशासन भविष्यात करणार असल्याचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.