Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 12:08 IST2025-06-15T12:04:15+5:302025-06-15T12:08:51+5:30
Bhiwandi Chemical Godown Fire: अंजूर फाटा-दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी केमिकल साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागली

Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
भिवंडी: अंजूर फाटा-दापोडा रस्त्यावरील वळ गावाच्या हद्दीत शनिवारी सायंकाळी केमिकल साठवलेल्या गोदामाला भीषण आग लागली. आगीत १२ गोदामे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविली.
वळ ग्रामपंचायत भोईर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील आठ गोदामांत मोठ्या प्रमाणावर केमिकल ड्रम व पावडर साठवलेल्या ठिकाणी सुरुवातीला आग लागली. गोदामात केमिकल असल्याने आग झपाट्याने पसरली. पाहता-पाहता आगीच्या भक्षस्थानी १२ गोदामे पडली. गोदामात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील केमिकल असल्याने संपूर्ण परिसरात उग्र वास व धूर पसरला होता. यामुळे नागरिकांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास जाणवू लागला. भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग वाढू लागल्याने कल्याण व ठाणे अग्निशमन दलाच्या गाड्यासुद्धा पाचारण करण्यात आल्या.
पाणी टँकरला अडचण
अंजूर फाटा ते दापोडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी असल्याने पाणी घेऊन येणारे टँकर घटनास्थळी दाखल होण्यास अडचण निर्माण झाली होती. नारपोली पोलिस ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर गर्दी नियंत्रणात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, आग नक्की कोणत्या कारणामुळे लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.