बहिणीची छेड काढल्याने तिघांवर झाडल्या गोळ्या; एकाचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 06:36 IST2026-04-03T06:34:53+5:302026-04-03T06:36:35+5:30
मुंब्यातील धक्कादायक घटना

बहिणीची छेड काढल्याने तिघांवर झाडल्या गोळ्या; एकाचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरू
ठाणे/मुंब्रा : मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या वादातून एका व्यक्तीने तिघांवर गोळ्या झाडल्या. यात एकाचा मृत्यू झाला तर, दोघे जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना मुंब्रा परिसरात गुरुवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मुंब्रा येथील कैलासनगर भागातील सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील बिस्मिल्ला चाळीत गोळीबाराची घटना घडली. जयन शिवानंदन नायर (५१) याच्या मानलेल्या बहिणीची काही जणांनी छेड काढल्याचा आरोप आहे. यावरून संबंधितांमध्ये आधी वाद झाला होता. हा वाद चिघळल्यानंतर जयनने संतापाच्या भरात तिघांवर गोळीबार केला. त्यात अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर कैलासनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंब्रा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून जयन यास अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्व्हर जप्त केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंब्रा पोलिस तपास करत आहेत.
ठाण्यात गोळीबाराच्या घटनांची मालिका
गेल्या काही दिवसांत ठाणे आणि मुंब्रा परिसरात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंब्यातील कौसा भागात एका वाहनावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पाचपाखाडी परिसरातही भर रस्त्यात गोळीबार झाला होता. गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपी जयन शिवानंदन नायर यास अटक केली असून, चौकशी सुरू आहे- अनिल शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक