फसवणुकीचे ‘शतक’ करणारा मुकेश अखेर चतुर्भूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:32 AM2019-11-06T00:32:30+5:302019-11-06T00:32:49+5:30

पोलिसाच्या अंगावर गाडी घालून झाला होता पसार : चार दिवसांत आवळल्या मुसक्या, आरोपीला पाच भाषा अवगत

Mukesh, the 'century' of fraud, finally quadrupled in thane | फसवणुकीचे ‘शतक’ करणारा मुकेश अखेर चतुर्भूज

फसवणुकीचे ‘शतक’ करणारा मुकेश अखेर चतुर्भूज

Next

सचिन सागरे

फसवणुकीची शंभरी गाठणाऱ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी कल्याणच्या अ‍ॅन्टीरॉबरी पथकाने सापळा लावला. आरोपीवर झडप घालून पोलीस त्याला पकडणार तोच अचानक त्याने साथीदाराच्या मदतीने पळ काढला. एका पोलीस कर्मचाºयाच्या अंगावर कार घालत त्याला जखमीही केले. त्यानंतर वेशांतर करुन राहण्याचे ठिकाणदेखील त्याने बदलले. पण, ज्या कारमध्ये बसून तो पळून गेला होता, त्याच कारने त्याला पुन्हा पकडून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अ‍ॅन्टीरॉबरी पथकाने अवघ्या चार दिवसांतच त्याच्या मुसक्या आवळल्या.

कल्याण डोंबिवली शहरात बँकेच्या बाहेर उभे राहून नागरिकांना फसवण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले होते. त्यामुळे परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टीरॉबरी पथक शहरात गस्त घालत होते. ३० आॅगस्ट रोजी नेहमीप्रमाणे गस्त घालताना या पथकास सराईत गुन्हेगार मोहम्मद अब्बास उर्फ राजू हा पश्चिमेतील संतोषीमाता रोड परिसरात असलेल्या एका बँकेत जात असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांच्या निदर्शनास आले. पाळदे आणि पोलीस शिपाई सुनील गावीत हे दोघे त्याच्या पाठोपाठ बँकेत गेले. त्यावेळी बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या साथीदाराचा शोध घेत त्याच्यावर पाळत ठेवण्यास पाळदे यांनी पथकाला सांगितले. त्यांच्या सांगण्यानुसार पथकातील अमोर गोरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी अब्बासला हेरुन त्याच्या कारला घेराव घातला. बँकेत येऊन आपले सावज हेरणाºया अब्बासला पाळदे यांनी हटकले. पोलिसांनी आपल्याला घेरल्याचे अब्बासच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्याने पळ काढून जवळच मुकेश बसलेल्या कारमध्ये बसला. या कारसमोरच गोरे उभे होते. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून मुकेशने गोरे यांच्या अंगावर कार घालत त्यांना जखमी केले आणि अब्बाससह तेथून पोबारा केला. जखमी गोरे यांना पथकातील कर्मचाºयांनी रुग्णालयात दाखल केले. नागरिकांना फसवणारे दोघे सराईत गुन्हेगार पोलीस कर्मचाºयाच्या अंगावर गाडी घालून पळून गेले. त्यामुळे, त्याला शोधायचा चंग अन्टीरॉबरी पथकाने मनाशी बांधला आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. दुसरीकडे अब्बास आणि मुकेश या दोघांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अन्टीरॉबरी पथकाने मुकेश आणि त्याचा साथीदार अब्बास याच्याबाबत चौकशी करायला सुरुवात केली. मुकेशने डोंबिवली येथील एका बँक कॅशियरला काही दिवसांपूर्वीच २ लाखांचा गंडा घातल्याचे पथकाला समजले. कोलकाता पोलीस त्याचा शोध घेत असल्याचीही माहिती त्यांना मिळाली. मुकेशविरोधात सांगली येथे गुन्हे दाखल आहेत. आंध्रप्रदेश, गुजरात, पुणे, पश्चिम बंगाल, दिव-दमण येथेही त्याच्याविरूद्ध गुन्हे दाखल असल्याचे पथकाला चौकशीदरम्यान समजले. एका ठिकाणी गुन्हा केल्यानंतर मुकेश आपले राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याला शोधणे म्हणजे पथकासाठी एकप्रकारचे आव्हानच होते. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टीरॉबरी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक पाळदे यांच्यासह पोलीस हवालदार सुनील पवार, पोलीस नाईक दीपक गडगे, नरेंद्र बागुल, उपेश सावळे, निसार पिंजारी, नरेश दळवी, पोलीस शिपाई रवींद्र हासे, चिंतामण कातकडे, सुनील गावित यांनी मुकेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. ज्या गाडीने पोलीस कर्मचारी गोरे यांना उडवले होते, ती गाडी भिवंडी ग्रामीण भागातील एका इमारतीच्या आवारात उभी असल्याची माहिती पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, मुकेश राहत असलेल्या घराला कुलूप बघून पथक निराश झाले. त्यांनी आसपास मुकेशबाबत चौकशी केली असता, तो ४ ते ५ दिवसांपूर्वीच दुसरीकडे राहायला गेल्याचे सांगण्यात आले.

मुकेशने वसई, नाशिक, भिवंडी येथे भाड्याने घरे घेतली होती, तर शिर्डी येथे एक फार्महाऊस आणि एक तळेही घेतले होते. या तळ्यातून मिळणाºया मच्छिवर आपण उपजिवीका करत असल्याचे त्याने शेजाºयांना सांगितले होते. त्याचा थाटमाट पाहता परिसरात तो मुकेशशेठ नावानेच प्रसिध्द होता. त्याचवेळी सहायक पोलीस निरीक्षक पाळदे यांना एक फोन आला. फोन करणाºयाने त्यांना सांगितले की, ते शोध घेत असलेल्या वर्णानाची एक व्यक्ती दोन महिलांसह वासिंद परिसरात नुकतीच राहायला गेली आहे. त्या माहितीच्या आधारावर पथकाने आपला मोर्चा वासिंदच्या दिशेने वळवला. या परिसरात नुकत्याच राहायला आलेल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास पथकाने सुरुवात केली. तेव्हा शहराच्या बाहेरील बाजूला असलेल्या एका नवीन इमारतीमध्ये अशा वर्णनाचु व्यक्ती दोन महिलांसह नुकतीच राहायला आल्याचे पथकाला समजले. त्याठिकाणी धडकलेल्या पथकाला एका घरात मुकेश दोन महिलांसह राहत असल्याचे आढळून आले. पथकाने त्याला ताब्यात घेत कल्याणमधील पोलीस ठाण्यात आणले. मुकेश हा मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयाचा वाणिज्य शाखेचा पदवीधर असून त्याचे वडिल सरकारी अधिकारी होते. मुकेशला हिंदी, इंग्रजी, मराठी, मल्ल्याळम, तामिळ या भाषा बोलता येतात. सावज जाळ्यात फसताच तो आपण उच्चशिक्षित असल्याचे दाखवत होता. कल्याण डोंबिवलीमध्ये फसवणूक करताना, मुकेशने आगरी भाषेचादेखील वापर केला असल्याचे पथकाला चौकशीदरम्यान समजले. कल्याण, उल्हासनगर परिसरातील चार गुन्ह्यांची कबुली मुकेशने दिली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

एका शहरात गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी विमानाने प्रवास करणारा मुकेश आपल्यासोबत दोन महिलांना घेऊन जात होता. मुकेश आपले सर्व व्यवहार त्या दोघींच्या नावानेच करत होता. यापूर्वी दोनवेळा रस्त्यातील गाड्यांना ठोकून पोबारा करणाºया मुकेशला दमन पोलिसांनी अटकही केली होती. मुकेशच्या विरोधात यापूर्वी ५० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून २० पेक्षा जास्त गुन्ह्यांत तो पोलिसांना पाहिजे होता.
 

Web Title: Mukesh, the 'century' of fraud, finally quadrupled in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.