अँटीजेन चाचणीविरोधात भाईंदरच्या झोपडपट्टीतील महिलांचा पालिकेवर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 22:22 IST2020-09-21T22:21:56+5:302020-09-21T22:22:11+5:30
भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमधील रहिवाश्यांची नियमित अँटीजेन चाचणी चालविल्याने आज काही महिला पालिकेचे प्रवेशद्वार उघडून आत शिरल्या आणि चाचणीचा विरोध केला.

अँटीजेन चाचणीविरोधात भाईंदरच्या झोपडपट्टीतील महिलांचा पालिकेवर मोर्चा
मीरारोड - मीरा-भाईंदर महापालिकेने कोरोना रुग्णांना शोधून काढण्यासह झटपट चाचणी अहवाल मिळावा म्हणून अँटीजेन चाचणी सुरू केली. भाईंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमधील रहिवाश्यांची नियमित अँटीजेन चाचणी चालविल्याने आज काही महिला पालिकेचे प्रवेशद्वार उघडून आत शिरल्या आणि चाचणीचा विरोध केला.
पालिका मुख्यालयाचे बाहेरचे बंद प्रवेशद्वार आज गणेश देवल नगर झोपडपट्टीतील काही महिलांनी जबरदस्तीने उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर आवारात जमून त्यांनी पालिकेने अँटीजेन चाचणी जबरदस्तीने चालवल्याचा आरोप केला. महिला म्हणाल्या की, पालिका कर्मचारी, पोलीस, बाउन्सर आदी वाटेत जो भेटेल त्याला पकडून चाचणी करतात. हे रोजचे चालले असून एखाद्याची चाचणी केली असेल तरी परत चाचणी करतात. ह्या लोकांना कोरोना दाखवून भरती करायचे तेवढेच कळते, असा संताप महिलांनी बोलून दाखवला.
तर सदर महिलांना कोणी तरी भडकावून पालिकेवर मोर्चा काढण्यास पाठवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण कोरोनाचे रुग्ण शोधून काढण्यासाठी व शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून गैरसमज पसरवून लोकांना भडकवले जात असल्याने यातून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती पालिका सूत्रांनी बोलून दाखवली.