धावत्या रिक्षामध्ये हेअर ड्रेसर्स तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 21:04 IST2018-12-12T20:55:59+5:302018-12-12T21:04:14+5:30
एकाच ठिकाणी कामावर असलेल्या सह कर्मचारी तरुणीचा रस्त्याने आणि रिक्षातही पाठलाग करुन विनयभंग करणा-या हेमंत सोनवणे या आरोपीला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

कासारवडवली पोलिसांची कारवाई
ठाणे: धावत्या रिक्षामध्ये एका ३० वर्षीय हेअर ड्रेसर्स तरुणीचा विनयभंग करणा-या हेमंत सोनवणे (३०,रा. पाचपाखाडी, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
तक्रारदार तरुणी ठाण्यातील टेंभी नाका परिसरात वास्तव्याला असून घोडबंदर रोडवरील एका स्टुडिओमध्ये ती हेअर ड्रेसर्स म्हणून काम करते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी कामावरून सुटल्यानंतर ती घरी जाण्यासाठी निघाली होती. तिच्यासोबत काम करणारा हेमंतही त्यावेळी तिच्याबरोबरच पायी जात होता. त्याचवेळी त्याने तिचा हात पकडल्यानतर तिने तो झटकून त्याला दूर राहण्याबाबत बजावले. नंतर तिच्यापाठोपाठ तोही एकाच रिक्षात बसला. त्यावेळीही त्याने गैरप्रकार केला. पुन्हा ६ डिसेंबर रोजीही ती कामावरून सुटल्यानंतर रिक्षातून घरी जाताना तो पुन्हा तिच्यासोबत रिक्षात बसला आणि तिचा विनयभंग केला. यावेळी तिने आरडाओरडा करुन रिक्षा थांबविली.रिक्षा थांबल्यानंतर मात्र तिने त्याला जोरदार प्रतिकार करीत त्याच्या श्रीमुखात लगावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिलाच ढकलले. त्यावेळी ती कोसळल्यामुळे तिला किरकोळ मारही लागला. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आधी नौपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी १० डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. नंतर तो कासारवडवली पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.