कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी देत एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 22:18 IST2017-11-16T22:18:04+5:302017-11-16T22:18:28+5:30
कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी देत एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणा-या अमित गुप्ता (१९) याला कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी देत एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग
ठाणे: कुटूंबियांना ठार मारण्याची धमकी देत एका १६ वर्षीय तरुणीचा विनयभंग करणा-या अमित गुप्ता (१९) याला कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
माजीवडा सेवा रस्त्याच्या कडेला राहणा-या या मुलीची भिवंडीच्या काल्त्हेर भागात राहणा-या अमितबरोबर काही दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. याच ओळखीचा फायदा घेऊन १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याने तिला तिच्या घराजवळील रस्त्यातच थांबवून तिचा हात पकडला.
तिच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून भावाला आणि कुटंूबियांना ठार मारण्याची धमकी देत तिला त्याच्या मोटारसायकलवर बसण्यास भाग पाडले. नंतर घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल परिसरात नेऊन दमदाटी करीत तिचा विनयभंग केला. तिच्या मोबाईलमध्येही छेडछाड करीत तिच्या मोबाईलमधून अन्य कोणाला तरी मेसेज पाठविला. या सर्व प्रकारानंतर तिने त्याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक केल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बन्सी बारावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.