दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्र्यांनी उद्धाटन केलेल्या हॉस्पिटलविरोधात मनसेचा आंदोलनाचा इशारा, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 19:17 IST2020-06-20T19:17:15+5:302020-06-20T19:17:46+5:30
कोरोनाचे लक्षणे असलेल्या व कोरोना पोझिटीव्ह रुग्णांवर येथे महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत उपचार केले जातील, असे उद्घाटन वेळीं पालकमंत्री शिंदे यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात रुग्णांना भरती करतेवेळी रुग्णालय अनामत रक्कम मागत असल्याचा आरोप

दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्र्यांनी उद्धाटन केलेल्या हॉस्पिटलविरोधात मनसेचा आंदोलनाचा इशारा, कारण...
सदानंद नाईक
उल्हासनगर : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोन दिवसापूर्वी उद्घाटन झालेल्या साई प्लॅटिनम रुग्णालयात अनामत रक्कमे शिवाय सर्वसामान्य नागरिकांना एन्ट्री नसल्याचा आरोप मनसेनेने केला. अनामत रक्कम बंद झाली नाहीतर, मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला. तर महापालिका आयुक्त समीर उन्हाळे यांनी पालिका कोविड रुग्णालयाकडून पुरेसे बेड असल्याची माहिती दिली आहे.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत नसून रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी कॅम्प नं -३ शांतीनगर मध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयालनी, महापौर लीलाबाई अशान, आयुक्त समीर उन्हाळे, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया आदींच्या हस्ते खाजगी संस्थेच्या व महापालिकेच्या मदतीने उभे राहिलेल्या साई प्लॅटिनम रुग्णालयाचे उद्घाटन दोन दिवसापूर्वी झाले. कोरोनाचे लक्षणे असलेल्या व कोरोना पोझिटीव्ह रुग्णांवर येथे महात्मा फुले आरोग्य योजने अंतर्गत उपचार केले जातील, असे उद्घाटन वेळीं पालकमंत्री शिंदे यांनी म्हटले होते. प्रत्यक्षात रुग्णांना भरती करतेवेळी रुग्णालय अनामत रक्कम मागत असल्याचा आरोप मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी केला. हाताला काम नसलेल्या गोरगरीब नागरिकांनी अनामत रक्कम कुठून आणावी. असा प्रश्न त्यांनी करून महापालिका आरोग्य विभागातील सावळागोंधळ उघड केला.
महापालिकेले उभारलेल्या रेड क्रॉस रुग्णालयात कोरोनाचे लक्षणे असलेल्या रुग्णाना भरती करून त्यांचा कोरोना स्वाब अहवाल पोझिटीव्ह येई पर्यंत उपचार केले जाते. त्यानंतर पोझिटीव्ह रुग्णांना महापालिकेने उभारलेल्या कोविड रुग्णालयात हलविले जाते. मात्र रेड क्रॉस येथे फक्त २५ बेड उपलब्ध असल्याने शेकडोच्या संख्येत असलेल्या कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णाना उपचार मिळत नाही. त्यामुळे उपचारा विना रुग्णाचे हाल होवून जीवावर बेतण्याची शक्यता व्यक्त केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या साई प्लटीनम रुग्णालयात रुग्णांकडून घेत असलेली अनामत रक्कम घेणे बंद केली नाहीतर मनसे रस्त्यावर उतरणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
महापालिका कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध - आयुक्त समीर उन्हाळे
कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर रेड क्रॉस रुग्णालयात उपचार केले जाते. तर कोरोना संशयित रुग्णांना भिवंडी बायपास रोड शेजारील टाटा आमंत्रण इमारती मध्ये क्वारंटाईन केले जाते. त्यांचा स्वाब अहवालानंतर पोझीटीव्ह आल्यावर त्यांना कोविड रुग्णालयात भरती केले जाते. साई प्लॅटिनम रुग्णालया ऐवजी नागरिकांनी पालिका कोरोना रुग्णा झेलयात संशयित रुग्णांनी उपचारासाठी जावे. असे मत आयुक्तांनी व्यक्त केले. तसेच साई प्लॅटिनम रुग्णालयाच्या बाबत पालिका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून माहिती घेणार असल्याचे मत व्यक्त केले.