खंडणी उकळणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:37 IST2025-01-31T09:37:09+5:302025-01-31T09:37:37+5:30
व्यापाऱ्यांकडून महिना २० हजारांची मागणी.

खंडणी उकळणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या औद्योगिक वसाहतीतील व्यापाऱ्यांना त्यांच्या मनसेच्या माथाडी कामगार सेनेचा सदस्य व्हा अन्यथा कारखाने चालू देणार नाही, असे सांगून महिना २० हजारांची खंडणी व्यापाऱ्यांकडून उकळणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यास नवघर पोलिसांनी अटक केली आहे.
औद्योगिक वसाहतीत भाईंदर स्टेनलेस स्टील मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स नावाची संस्था आहे. महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचा पदाधिकारी चंद्रशेखर जाधव हा साथीदारांसह मिळून व्यापाऱ्यांना त्याच्या संघटनेचे सभासद व्हा, नाही तर तुमचा कारखाना चालू देणार नाही. अन्यथा महिना २० हजार रुपये पाकीट द्या, असे धमकावत असे.
खंडणी, धमक्यांंना कंटाळल्यानंतर तक्रार
येथील स्टील भांडी बनवणारे दीपक अग्रवाल, मोहन बिश्नोई, प्रभुलाल गुज्जर, किशोरभाई देढिया, मिठालाल पड्यार, अशोक पुरोहित, मनोहर गुज्जर, धरमसिंह गुज्जर आदींकडून एप्रिल २०२४ पासून दर महिना २० हजारांची खंडणी उकळली.
त्यानंतर २५ जानेवारी रोजीही अग्रवाल, गुज्जर आदी व्यापाऱ्यांना धमकावले. अखेर नेहमीच्या खंडणी आणि धमक्यांना कंटाळून व्यापाऱ्यांनी २९ जानेवारी रोजी नवघर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली.
फिर्यादीनंतर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून चंद्रशेखर जाधव याला अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवास गारळे हे तपास करीत आहेत.