अंबरनाथमध्ये मनसेचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:32 IST2018-08-22T00:31:51+5:302018-08-22T00:32:16+5:30
चुकीच्या ठिकाणी स्वयंचलित जिना; प्रवाशांसाठी ठरतोय गैरसोयीचा

अंबरनाथमध्ये मनसेचे आंदोलन
अंबरनाथ : अंबरनाथ स्थानकात ज्या फलाटावर स्वयंचलित जिन्याची गरज होती त्या ठिकाणी जिना न बसवता स्थानकाबाहेर बसविण्यात आला आहे. त्यामुळे या स्वयंचलित जिन्याचा वापर प्रवाशांसाठी होतच नाही. या चुकीच्या नियोजनाविरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रेल्वेस्थानकात आंदोलन केले. या आंदोलनानंतर रेल्वेच्या अधिकाºयांनीही सरकते जिने चुकीच्या ठिकाणी लावल्याचे कबूल केले. मात्र, या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
अंबरनाथ स्थानकात फलाट एक आणि दोन या ठिकाणी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. दोन्ही फलाटांवर एकाच वेळी गाड्या आल्यावर प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. सर्व स्थानकांमध्ये स्वयंचलित जिने बसविण्याचे काम सुरू असताना अंबरनाथ स्थानकातही एक स्वयंचलित जिना मंजूर करण्यात आला. स्थानकातील फलाट क्रमांक एक, दोन आणि तीन पैकी एकाही फलाटावर हा सरकता जिना बसविण्यात आला नाही. उलट फलाट क्रमांक-एकच्या पलीकडे मोकळ्या जागेवर सरकता जिना बसविण्यात आला आहे. मुळात या जिन्याचा वापर लोकलमधून उतरणाºया एकाही प्रवाशाला होत नाही.
रेल्वे प्रशासनाच्या या चुकीच्या नियोजनाचा निषेध करण्यासाठी मनसेने अंबरनाथ रेल्वेस्थानकात आंदोलन केले. जिल्हा संघटक संदीप लकडे आणि शहरप्रमुख कुणाल भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले.