आमदाराला महिलेचा आवाज काढून १० लाखांसाठी धमकी; तांत्रिक तपासाच्या आधारे ठाणे पोलिसांची कोल्हापुरात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:17 IST2025-10-14T15:16:31+5:302025-10-14T15:17:42+5:30
वर्षभरापासून पाटील यांना ताे एका महिलेच्या आवाजात फाेन करून बाेलण्यात गुंतवत हाेता. अश्लील मेसेज, फाेटाे, व्हिडीओ पाठवून त्यांच्याकडे दाेन वेगवेगळ्या माेबाइल क्रमांकांवरून पाच ते दहा लाखांची खंडणी मागितली हाेती. पाटील यांच्या तक्रारीनुसार चितळसर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.

प्रतिकात्मक फोटो...
ठाणे : काेल्हापूरच्या चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना व्हॉट्सॲपवरून अश्लील फाेटाे पाठवून त्यांच्याकडून १० लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहन ज्योतिबा पवार (२६) याला अटक करण्यात आली.
वर्षभरापासून पाटील यांना ताे एका महिलेच्या आवाजात फाेन करून बाेलण्यात गुंतवत हाेता. अश्लील मेसेज, फाेटाे, व्हिडीओ पाठवून त्यांच्याकडे दाेन वेगवेगळ्या माेबाइल क्रमांकांवरून पाच ते दहा लाखांची खंडणी मागितली हाेती. पाटील यांच्या तक्रारीनुसार चितळसर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.
सीडीआर आला कामी
पाेलिस आयुक्त आशुताेष डुंबरे, सहपाेलिस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि उपायुक्त कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सुनील वरुडे, उपनिरीक्षक अतुल जगताप आणि हवालदार राजाराम पाटील यांच्या पथकाने आराेपीने वापरलेल्या दोन्ही मोबाइल क्रमांकांचे सीडीआर आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी मोहन पवार याला काेल्हापूरच्या चंदगडमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या.
बेराेजगारीतून केला गुन्हा
आराेपी माेहन पवार हा चंदगडचा रहिवासी असून, त्याने लाेणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये वेटरचे काम केले. हे काम एप्रिल २०२५ मध्ये सुटल्यानंतर ताे तृतीय वर्ष विज्ञानच्या परीक्षेसाठी गावी परतला हाेता.
ताे नाेकरी मागण्यासाठी आ. पाटील यांच्या घरी गेला हाेता. त्यावेळी त्यांनी त्याला काही खायला दिले आणि माेबाइल क्रमांकही दिला. त्याने पाटील यांना मेसेज, फाेटाे पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बँक खात्यात २,२०० रुपये असल्याचे चाैकशीत उघड झाले.