MLA Sarnaik to the Chief Minister for a fund of Rs 180 crore for setting up a hospital at Mira Road | मीरारोड येथे रुग्णालय उभारणीसाठी १८० कोटींच्या निधीसाठी आमदार सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मीरारोड येथे रुग्णालय उभारणीसाठी १८० कोटींच्या निधीसाठी आमदार सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मीरारोड - मीरारोड मधील रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर रुग्णालय बांधण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात १८० कोटी रुपयांची तरतूद करावी असे  साकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना घातले आहे . 

महानगरपालिका हद्दीतील आरक्षण क्र. ३०२ हा भुखंड रूग्णालयासाठी आरक्षित आहे . १३ हजार चौमी क्षेत्राचा हा भुखंड पालिकेने टीडीआर देऊन ताब्यात घ्यावा अशी मागणी जून २०२० पासून आयुक्तां कडे चालवली आहे . सदर रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडावर अद्ययावत रूग्णालय तसेच डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था व परिचारिका यांच्या प्रक्षिशण केंद्राची उभारणी होऊ शकते असे सरनाईकांचे म्हणणे आहे . 

सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मीरा भाईंदरच्या रूग्णालयासाठी १८० कोटी रूपयांची तरतूद करावी अशी विनंती सरनाईक यांनी केली आहे. रूग्णालयाच्या निर्मितीसाठी किमान ३ ते ४ वर्ष लागणार असून ही रक्कम सरकारकडून टप्याटप्याने महानगरपालिकेला द्यावी, जेणेकरून रूग्णालयाची उभारणी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालय उभारण्याच्या मागणीत लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले . 

कोरोना'च्या संकट काळात शहरामध्ये रूग्णालयांची संख्या अपुरी पडून अनेक रुग्णांचे हाल झाले. काही खासगी रूग्णालयांनी गलेगठ्ठ बिले आकारली व जनतेची लूट केली. वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भाईंदर मधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय तर मीरारोड मधील भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय अपुरे पडत आहेत . त्यामुळे नवीन सुसज्ज सरकारी रुग्णालय उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. सरनाईक म्हणाले . 

Web Title: MLA Sarnaik to the Chief Minister for a fund of Rs 180 crore for setting up a hospital at Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.