१९ कोटींचे कचऱ्याचे डब्बे खरेदी करण्याचा मीरा-भाईंदर महापालिकेचा अट्टहास कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 07:52 IST2025-07-17T07:49:53+5:302025-07-17T07:52:41+5:30

आयआयटी कडे पत्र पाठवून दराची पडताळणी करण्यासह मागितली तांत्रिक मंजुरी 

Mira-Bhayander Municipal Corporation's determination to purchase garbage bins worth Rs 19 crore remains intact | १९ कोटींचे कचऱ्याचे डब्बे खरेदी करण्याचा मीरा-भाईंदर महापालिकेचा अट्टहास कायम

१९ कोटींचे कचऱ्याचे डब्बे खरेदी करण्याचा मीरा-भाईंदर महापालिकेचा अट्टहास कायम

धीरज परब

मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेचा १९ कोटी खर्चून कचऱ्याचे डब्बे खरेदी करण्याचा अट्टहास कायम आहे. महापालिकेने मुंबईच्या आयआयटीला पत्र पाठवून निविदेतील कचऱ्याच्या डब्ब्यांच्या दरांची पडताळणी करण्यासह तांत्रिक मंजुरी देण्याची विनंती केली आहे. इतकेच नव्हे तर या कामासाठीचे शुल्क देण्यास देखील महापालिकेने तयारी दर्शवली आहे. 

शासनाच्या मूलभूत सोयीसुविधांचा विकास यासाठी विशेष तरतूद योजने अंतर्गत महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी ३० जून रोजी ३ हजार ८८९ कचऱ्याच्या डब्ब्यांच्या खरेदीसाठी १८ कोटी ६५ लाख ३८ हजार ८०८ रुपयांचा ठेका कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरला देण्याची निविदा मंजुर केली.  सोलार पॅनलसह ऑटोमॅटिक कचऱ्याचे २१ डबे खरेदी व प्रति डब्बा तब्बल ९ लाख ३४ हजार ५६० रुपये.  स्टेनलेस स्टील वा पावडर कोटेड वा ॲल्युमिनियमचे असे ३ स्टेनलेस स्टील डब्यांचे प्रति संच ६९ हजार ६८८ रुपये प्रमाणे ५०० संच खरेदी. तर २ डब्यांचे प्रति संच ६६ हजार १८३ रुपये प्रमाणे ५०० संच खरेदी. तर फायबरचे १२० ली., २४० ली.  व १९० लिटर क्षमतेचे प्रति कचरा डबा ३४ हजार ५११ रुपये प्रमाणे २ हजार ८६८ डब्बे खरेदीची निविदा आयुक्तांनी प्रशासकीय अधिकारात मंजूर केल्यानंतर त्यावर आरोप आणि टीकेची झोड उठली आहे. 

१९ कोटीची खिरापत कचऱ्याच्या डब्ब्यांसाठी वाटण्याऐवजी नागरिकांना दिलासा मिळेल अशी कामे करण्याची मागणी होत आहे. कचऱ्याच्या डब्ब्यांचे अव्वाच्या सव्वा दर पाहून सामान्य नागरिकांचे देखील डोळे पांढरे झाले आहेत. निविदा प्रक्रिया, ठेकेदारास फायद्याच्या अटी आणि दर ह्यावर संशय व्यक्त होऊन चौकशी करण्या पासून गुन्हे दाखल करण्यापर्यंतच्या मागण्या व तक्रारी होत आहेत. कचरा डब्बे उत्पादक कंपन्यांकडून थेट दर का मागवले गेले नाहीत? असे सवाल केले जात आहेत. 

ह्या आधी देखील निवडणुकीच्या अनुषंगाने नगरसेवकांच्या ठरावावरून पालिकेने कचऱ्याचे डब्बे असेच अवास्तव दराने खरेदी केले होते. ते डब्बे फारसे टिकले नाहीत तर अनेक डब्बे चोरीला गेले. त्यामुळे तब्बल १९ कोटी खर्चून कचऱ्याचे डब्बे खरेदी बद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. परंतु महापालिका प्रशासन मात्र १९ कोटींचे कचऱ्याचे डब्बे खरेदी करण्याचा चंग  बांधून आहे. आरोप व टीका होऊन देखील पालिकेचे शहर अभियंता दिपक खांबित यांनी मुंबई आयआयटीचे डॉ. अनिल दीक्षित यांना तातडीने पत्र पाठवून निविदेतील डब्बे खरेदीचे दर याची पडताळणी आणि तांत्रिक मंजुरी देण्याची विनंती केली आहे. 

पत्रामध्ये घनकचरा प्रकल्पाअंतर्गत कचऱ्याचे डबे खरेदी कामाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यात पालिकेने कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर ह्या ठेकेदाराच्या मंजूर निविदेतील डब्ब्यांचे विविध प्रकार आणि दर यांचा तक्ता दिला आहे. सदर अंदाजपत्रकातील दर यांची तपासणी करण्यासह तांत्रिक मंजुरी देण्याचे पालिकेने नमूद केले आहे. ह्या तांत्रिक मंजुरी व दराची तपासणी साठी आवश्यक असलेले शुल्क देखील आयआयटीला देण्याची तयारी पालिकेने दर्शवली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन कचऱ्याच्या तब्ब्यांवर १९ कोटी खर्च करण्यावर ठाम असल्याचे मानले जात आहे.

Web Title: Mira-Bhayander Municipal Corporation's determination to purchase garbage bins worth Rs 19 crore remains intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.